महाराष्ट्रात वैदिकपूर्व काळातील शिवलिंग आढळले !
अमरावतीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. व्ही.टी. इंगोले यांच्या नेतृत्वाखाली केले शोधकार्य
नागपूर – अमरावतीपासून ८० कि.मी. अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वतराजींमध्ये इतिहास अभ्यासकांनी पुरातन शिवलिंगाचा शोध लावला आहे. हे शिवलिंग वैदिक काळापूर्वीचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील या परिसरात अनेक चित्रगुहा आहेत. त्यापैकी एका चित्रगुहेत शिवलिंग आढळले आहे. सातपुडा पर्वतरांगेत वर्ष २००७ मध्ये अमरावतीचे ज्येष्ठ संशोधक डॉ.व्ही.टी. इंगोले यांच्या नेतृत्वाखाली चमूने अश्मयुगीन चित्रगुहांचा सर्वप्रथम शोध लावला होता. या चमूने शोधलेले शिवलिंग हे नैसर्गिक स्वरूपात सिद्ध झाले असून अनुमाने २० फूट उंचीचे आहे. अमरावतीच्या या संशोधक चमूमध्ये वन्यजीव लेखक प्र. सु. हिरुरकर, पद्माकर लाड, डॉ. मनोहर खोडे, कुमार पाटील आणि दिवंगत ज्ञानेश्वर दमाहे यांचा समावेश आहे.
डॉ. इंगोले यांनी सांगितले की,
१. आमच्या चमूने केलेल्या अभ्यासाच्या वेळी त्यांना वर्ष २०१२ मध्ये हे शिवलिंग आढळून आले होते; मात्र त्याची प्रसिद्धी केल्यास आणि लोकांना त्या जागेची माहिती मिळाल्यास ती जागा आणि शिवलिंग यांची हानी होऊ शकते, या भावनेने आम्ही त्याविषयीची माहिती पुढे आणली नाही. आता पहिल्यांदा आम्ही ही माहिती घोषित करत आहोत.
२. या शिवलिंगावर लाल रंग आढळला आहे. तो रंग पूजेसाठी वापरला गेला असावा. वैदिकपूर्वकाळात शिवलिंग पूजा होत होती. या दगडांचा कालावधी बघता हे शिवलिंग वैदिकपूर्व काळातील असावे, या निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत. आम्ही शोध घेईपर्यंत हे ठिकाण अज्ञातच होते.
३. याच चित्रगुहेतील दगडावर कालभैरवाचे नृत्य करतांनाचे चित्रही रेखाटले आहे. तसेच जवळील एका शैलगृहात पांढर्या रंगातील ‘ॐ’ ची आकृती आहे. याविषयीचे आमचे संशोधन हे संक्षिप्त असून ते खोलवर आणि व्यापक स्वरूपात होणे आवश्यक आहे.
अश्मयुगीन, कांस्ययुगीन वसाहती
डॉ. व्ही.टी. इंगोले यांच्या चमूने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवर अश्मयुगीन चित्रगुहांचा शोध लावला होता. या परिसरातील मुंगसादेव नावाच्या चित्रगुहेत शहामृग पक्ष्याचे चित्र आढळले होते. इंगोले यांनी या चित्राचा अभ्यास करून शोधनिबंध सादर केला. त्यामुळे या चित्रगुहेतील चित्रांचा कालावधी अनुमाने ३५ सहस्र वर्षांपूर्वीचा असावा, याला अनेक संशोधकांनी मान्यता दिली आहे. भारतातील त्या काळातील ही अश्मयुगीन मानवाची सर्वांत मोठी आणि प्राचीन वसाहत असू शकते. या भागात अश्मयुगीन, कांस्ययुगीन वसाहती आढळून आल्या आहेत. कोरीव आणि गेरव्या, तसेच पांढर्या रंगातील चित्रे तेथे आहेत.