डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी मिल-गोदामांनी प्रशासनास सहकार्य करावे ! – मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर
सोलापूर, १ मे (वार्ता.) – जिल्ह्यात विविध डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी डाळ मिल मालक, परवानाधारक गोदाममालक, डाळ मिल असोसिएशनचे पदाधिकारी यांंनी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांच्या संदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला पोलीस उपायुक्त अजित बोर्हाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी मिल आणि गोदामांची पडताळणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी जिल्ह्यातील सर्व डाळ मिल आणि गोदामे यांची काटेकोर पडताळणी करावी, अशा सूचना पुरवठा विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. या वेळी शंभरकर म्हणाले, ‘‘पडताळणीसाठी आलेल्या पथकांना आवक-जावक रजिस्टर आणि अन्य सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. संकेतस्थळावर सत्य माहिती भरावी.’’