अवेळी पावसामुळे अनेकांचा संसार उघड्यावर; शेतीपिकांना मोठा फटका !

अमरावती शहराला बसला वादळी पावसाचा फटका, अनेक भागात झाडे कोसळून जनजीवन विस्कळीत

नागपूर – बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती आणि बीड या जिल्‍ह्यांत वादळी वार्‍यासह अवेळी पावसाने उपस्‍थिती लावली आहे. यामध्‍ये शेती पिकांसह घरांचीही मोठी हानी झाली आहे. अनेकांचा संसार या वादळी पावसामुळे उघड्यावर पडला आहे.

बुलढाणा जिल्‍ह्यात २९ एप्रिलच्‍या रात्री अनेक भागांत जोरदार अवेळी पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा आहे. थंड हवेमुळे मानवी आरोग्‍यावर परिणाम होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. बुलढाणा येथे गेल्‍या ७० वर्षांत एप्रिलमधील आज नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर शहर आणि जिल्‍ह्यात पुन्‍हा एकदा मोठा पाऊस आला. तिथे अनेक भागांत पाणी साचले होते. मुख्‍य मार्गावर पावसाचे पाणी साचल्‍याने वाहनांना वाट काढतांना कसरत करावी लागली. अमरावती जिल्‍ह्यातही जोरदार अवेळी पाऊस झाला आहे. शहरातील अनेक भागांत झाडे उन्‍मळून पडली आहेत.

सांगोला तालुक्‍यातील वाढेगाव परिसरातील दिघे वस्‍ती, हजारे वस्‍ती आणि इंगोले बामणे वस्‍ती या भागांतील वादळी वार्‍यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. यामुळे घरांतील संसारोपयोगी साहित्‍य आणि धान्‍य यांची मोठी हानी झाली आहे. या वादळात विजेचे खांबही पडल्‍याने विद्युत् पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. शेती पिकांचीही लाखो रुपयांची हानी झाली आहे. वादळी वार्‍याने कोंबड्याची खुरुडे आणि कोंबड्याही उडून गेल्‍या, तसेच झाडे उन्‍मळून पडली आहेत. त्‍याचप्रमाणे घरातील धान्‍य भिजले आहे. घरातील फॅन, टीव्‍ही, कपाट आदी वस्‍तूंचीही मोठे हानी झाली आहे. काही दुकानाचे पत्रे उडाल्‍याने दुकानातील सर्व साहित्‍य भिजले आहे.

जोरदार वादळी वार्‍यासह पाऊस आणि गारपिटीमुळे केज तालुक्‍यातील कुंभेफळ परिसरात शेतीची मोठी हानी झाली आहे. या वेळी गारांचा इतका मोठा सडा पडला की, लोकांनी घरातून अगदी टोपल्‍याने गारा भरून बाहेर नेऊन टाकल्‍या आहेत. अचानक झालेल्‍या गारपिटीमुळे भाजीपाल्‍यासह फळबागांचीही मोठी हानी झाली आहे. हा गारांचा पाऊस इतका मोठा होता की, शेतामध्‍ये जिकडे बघावे तिकडे पांढरी शुभ्र भूमी पहायला मिळत होती.