हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा अजून ७५ वर्षांनी देशात पाकचा झेंडा फडकेल ! – पू. संभाजी भिडेगुरुजी
रत्नागिरी, १ मे (वार्ता.) – आपली भारतमाता जेव्हा पारतंत्र्यात गेली, तेव्हा तिच्यासमवेत भगवा झेंडा होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र भारतमाता मुक्त झाली, ती तिरंग्यासह. महात्मा गांधीजींनी हे घडवून आणले होते. नुकताच आपण तिरंग्यासह आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. खरे तर हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज हा भगवाच होता आणि तोच असला पाहिजे. यासाठी आताच प्रयत्न करायला हवेत, अन्यथा अजून ७५ वर्षांनी देशात पाकिस्तानचा झेंडा फडकेल, असे परखड विचार श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी मांडले. ३० एप्रिल या दिवशी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने येथील पाटीदार भवन, टी.आर्.पी. येथे पू. भिडेगुरुजींचे सार्वजनिक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी त्यांनी आपल्या देशावर कधी ? कुणी ? किती ? आक्रमणे केली, ब्रिटिशांनी देशाचा अभ्यास करून आपल्याला आपल्या संस्कृतीपासून कसे दूर नेले ?याविषयी विस्तृतपणे सांगितले.
पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले की,
१. आता स्वातंत्र्यदिनी तालुकास्तरावर गल्लीगल्लीतून पदयात्रा काढा. या पदयात्रेमध्ये हातात भगवा ध्वज घेऊन सहभागी व्हा.
२. ‘हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असला पाहिजे’, ही मोहीम झाली पाहीजे.
३. आपला देश पुष्कळ महान आहे. ३ ऋतूंचे वरदान या देशाला लाभले आहे.
४. सुपीक भूमी आपल्याच देशात आहे.
५. संस्कृत ही आपली भाषा आहे. तिच्यातूनच २४६ भाषांचा उगम झाला आहे.
६. जो देश, समाज आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, तो देश, समाज विश्वाच्या संघर्षात ‘वाचत’ नाही. या सर्वांचे दु:खद उदाहरण म्हणजे हिंदुस्थान होय.