अस्वच्छ एस्.टी. स्थानकांविषयी ‘सुराज्य अभियाना’ची राज्य सरकारने घेतली नोंद !
‘सुराज्य अभियाना’च्या वतीने राज्य सरकारच्या ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना’चे स्वागत !
मुंबई – ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने गेल्या मासात जळगाव, कोल्हापूर, अमरावती, सोलापूर, पुणे, रायगड, पेण, अलीबाग, तसेच नागपूर येथील बसस्थानकांची दुरवस्था आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत बसस्थानकांची दुरवस्था आणि अस्वच्छता यांची छायाचित्रांसह माहिती निवेदनाच्या माध्यमातून एस्.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, तसेच परिवहन तथा मुख्यमंत्री यांना देण्यात आली होती. या संदर्भात प्रशासनासह बैठकाही घेण्यात आल्या. सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृतीही करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर ५६० बसस्थानकांची वर्षभर स्वच्छता करण्यासाठी ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान’ हाती घेतले आहे. गेले महिनाभर आम्ही राबवलेले ‘सुराज्य अभियान’ सार्थकी लागले, अशी भावना ‘सुराज्य अभियान’ समन्वयक श्री. अभिषेक मुरूकटे यांनी व्यक्त केली. ‘सुराज्य अभियान’च्या वतीने राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
#Maharashtra #MaharashtraDin @msrtcofficial एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प ! @mieknathshinde #हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ !
अभिनंदन @CMOMaharashtra जी
राष्ट्र निर्माण हेतू @SurajyaCampaign
#MaharashtraDiwas pic.twitter.com/TefRuTrwtw— Surajya Abhiyan (@SurajyaCampaign) May 1, 2023
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
१. ‘हा उपक्रम केवळ पुरस्कार मिळेल, म्हणून स्वच्छता अभियान येथपर्यंत मर्यादित न रहाता आपल्या सर्वांचे हे सामाजिक कर्तव्य आहे’, या भूमिकेतून नेहमीच एस्.टी. बसस्थानके स्वच्छ रहातील, यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे.
२. एस्.टी. महामंडळाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ घोषित केली होती; मात्र ४ मास उलटूनही सर्वच जिल्ह्यांतील मुख्य बसस्थानकांसह सर्वच बसस्थानकांची स्थिती न्यून-अधिक प्रमाणात विदारक असल्याचे दिसून आले. यात प्रामुख्याने बसस्थानकांच्या परिसरात कचर्याचे साम्राज्य, प्रसाधनगृहाची दुरवस्था, भित्तीपत्रकांमुळे विद्रूप झालेल्या भिंती, तुटलेली आणि अस्वच्छ बाकडी, बंद असलेले पिण्याच्या पाण्याचे नळ, जळमटांनी माखलेले छत, परिसरातील खड्डे, बंद उपहारगृहे, प्रसाधनगृहाचे तसेच सांडपाणी रस्त्यावर सोडणे आदी गोष्टी आढळून आल्या. बसस्थानकांच्या या दयनीय स्थितीविषयी ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत प्रत्येक बसस्थानकाच्या विभागीय नियंत्रकांना माहिती देण्यात आली.
३. यामध्ये अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वच्छ बसस्थानक’ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी, तसेच बसस्थानकांवर किमान प्राथमिक सुविधा तरी उपलब्ध व्हाव्यात, अशी आमची मागणी आहे. ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान’ हा नक्कीच चांगला प्रारंभ आहे. या अभियानासाठी राज्य सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी एक जागरूक संघटना म्हणून आम्ही निश्चितच राज्य सरकारला साहाय्य करू, असेही ‘सुराज्य अभियान’ समन्वयक श्री. मुरुकटे यांनी म्हटले आहे.