भारतीय तोफखान्यात ‘एम् ७७७ अल्ट्रा लाईट हॉवित्झर’ तोफ समाविष्ट !
भारतीय सैन्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की, भारतीय सैन्याच्या तोफखाना विभागात एक अत्याधुनिक तोफ समाविष्ट होणार आहे. ‘एम् ७७७ अल्ट्रा लाईट हॉवित्झर’ असे या तोफेचे नाव आहे. ही तोफ नेमके काय कार्य करते ? तिची तांत्रिक माहिती, तसेच या तोफेमुळे भारतीय सैन्याला कसा लाभ होईल ? याचे विश्लेषण आपण पहाणार आहोत.
१. मोठा पल्ला आणि विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये वापरता येणारी तोफ !
भारतीय सैन्याचे एक अंग म्हणजे तोफखाना होय. भारतीय तोफखान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा आहेत. याच तोफखान्यात आता ‘एम् ७७७ अल्ट्रा लाईट हॉवित्झर’ ही तोफ समाविष्ट झाल्याने भारतीय सैन्याला याचा पुष्कळ लाभ होणार आहे. या तोफेला स्वतःचे ‘इंजिन’ असल्याने ती ‘सेल्फ प्रोपेल्ड’ (एका जागेवरून दुसर्या जागेवर सहज नेण्याची क्षमता असलेली) आहे. वजन अल्प असल्याने डोंगराळ भागात हिचा वापर करता येतो. या तोफेचा गोळा २४ ते ४० किलोमीटर इतका लांब जाऊ शकतो, म्हणजेच याचा पल्ला मोठा आहे. तोफेच्या गोळ्यांमध्येही विविध प्रकार असतात. जेव्हा गोळा तोफेतून डागला जातो, तेव्हा गोळा पडलेल्या ठिकाणी त्याचे छर्रे किंवा तुकडे उडतात आणि तोफ डागलेल्या ठिकाणी जवळपास असलेले सैनिक मारले जातात. यातील स्फोटक पदार्थांचा स्फोटही होतो. वाळवंट, हिमालय आदी जागांवर ही तोफ वापरता येऊ शकते. ही तोफ भारत-चीन, भारत-पाकिस्तान सीमेवरही वापरली जाऊ शकते.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
२. भारतात तोफेची निर्मिती आणि मूल्य अल्प असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी
ही तोफ प्रथम अमेरिका येथे बनत असे; पण आता ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेच्या माध्यमातून भारताने ती देशात बनवण्यास चालू केले आहे. त्यामुळे याचे मूल्यही अल्प झाले आहे. भारताच्या तोफखान्यातही याची मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे. या तोफेतून निघणारे गोळे हे एका मिनिटाला २ किंवा ३ इतक्या प्रमाणात डागले जाऊ शकतात. काही तोफगोळ्यांच्या प्रकारांमध्ये त्यांची दिशाही पालटता येते. पारंपरिक युद्ध झाल्यास ही तोफ भारतीय सैन्याला अतिशय उत्तमपणे साहाय्य करू शकते.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे