अत्यंत अस्वच्छता, मोकाट जनावरे, इमारतीची दुरवस्था यांसह अनेक समस्या असलेले अक्कलकोट बसस्थानक !
एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका ! |
महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे देवस्थान असलेल्या अक्कलकोट येथील बसस्थानकाची दुरवस्था !
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटक येथूनच नाही, तर संपूर्ण भारतभरातून भाविक येतात, त्या अक्कलकोट बसस्थानकाची स्थिती अत्यंत वाईट आहे. बसस्थानकाच्या परिसरात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता असून येथे भटकी कुत्री, डुकरे अशा प्राण्यांचा अधिक वावर आढळतो.
१. बसस्थानकावरील स्वच्छतागृहाची स्थितीही अत्यंत वाईट आहे. बसस्थानकामधील छताची दुरवस्था झाली आहे.
२. कार्यालयाकडे जाणार्या जिन्यात ठिकठिकाणी पान, गुटखा खाऊन थुंकीच्या पिचकार्या दिसत असून टपाल खात्याची पत्रपेटीही अत्यंत वाईट अवस्थेत आहे.
३. बसस्थानकातील भिंतींचे रंग उडाले आहेत.
४. स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याने, तसेच प्रवाशांना शिस्त नसल्याने ते बसस्थानकाच्या परिसरात उघड्यावरच प्रातःर्विधी उरकतात.
५. येथील झाडांवरही खराब फडकी टाकलेली दिसतात.
बसस्थानकाच्या या स्थितीविषयी काही भाविकांनी अप्रसन्नता व्यक्त करत ‘राज्य परिवहन महामंडळ, तसेच स्थानिक नगरपालिका प्रशासन यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे’, असे मत व्यक्त केले.
अक्कलकोट बसस्थानकाचा पूर्णत: कायापालट होणार ! – योगेश कुलकर्णी, आगारप्रमुख
या दुरवस्थेविषयी आगारप्रमुख योगेश कुलकर्णी म्हणाले,
‘‘या स्थानकाचा मी नव्यानेच कार्यभार स्वीकारला आहे. सध्या मी आढावा घेत असून ज्या ज्या त्रुटी दूर करणे शक्य आहे, त्या लगेच दूर करण्याचा प्रयत्न करीन. अक्कलकोट बसस्थानक पूर्णत: नवीन करण्यासाठी २९ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे. त्यामुळे सद्यःस्थितीतील बसस्थानकाचा पूर्णत: कायापालट होणार असून अनेक समस्यांचे निराकरण होईल.’’
अधिक माहितीसाठी पहा ‘सनातन प्रभात’चे संकेतस्थळ !
बसस्थानकातील अस्वच्छतेची दुर्दशा दर्शवणारी अन्य छायाचित्रे पहाण्यासाठी
‘सनातन प्रभात’ संकेतस्थळाची मार्गिका : bit.ly/3KdwMec
(यातील काही अक्षरे ‘कॅपिटल’ आहेत, याची नोंद घ्यावी.)
आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सअॅप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा. |