रस्ते काँक्रिटीकरणाचे ६ कोटी रुपये खर्चाचे काम चालू; एका वर्षात तुर्भेगाव खड्डामुक्त होणार ! – रामचंद्र घरत, जिल्हाध्यक्ष, भाजप

रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी नागरिक तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते

नवी मुंबई – तुर्भे गावातील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला आहे. या रस्ते काँक्रिटीकरणामुळे एका वर्षात तुर्भेगाव खड्डामुक्त होईल, असा विश्वास स्थानिक माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी व्यक्त केला आहे. ते रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.

दुसर्‍या टप्प्यात अनुमाने २ कोटी रुपये खर्चून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. ६ मासांत (पावसाळा वगळता) हे काम पूर्ण होणार आहे. मुंबई-पुणे महामार्गाच्या लगतचे तुर्भेगाव प्रवेशद्वार ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, संपूर्ण तलाव परिसर यांसह अन्य मार्गाचे काँक्रिटीकरण या दुसर्‍या टप्प्यात करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्याचे साडेचार कोटी रुपयांचे काम चालू असून यामध्ये तुर्भेगाव प्रवेशद्वार ते शिवनेरी इमारत – सेक्टर २१ कॉलनीकडे जाणार मार्ग ते तुर्भेनाका येथपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. गावातील तलावाच्या लगत उद्यान, व्यायामशाळेचे (३ मजले) नूतनीकरण करणे, संत रामतनुमाता मैदानामध्ये भराव करून लॉन लावणे, विभाग कार्यालय इमारतीचे बांधकाम करणे आदी अनुमाने १५ कोटींहून अधिक रकमेच्या खर्चाची कामे लवकरच चालू होऊन तुर्भेगावाचे रूप पालटणार आहे, असा विश्वास रामचंद्र घरत यांनी व्यक्त केला आहे