‘महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’मुळे महिलांचे सबलीकरण ! – दत्ताजी थोरात
सातारा, ३० एप्रिल (वार्ता.) – महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळे अनेक अबला महिला सबला झाल्या आहेत. त्यामुळे त्या आज विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेत आहेत, असे प्रतिपादन ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’चे शाळा समिती अध्यक्ष दत्ताजी थोरात यांनी व्यक्त केले.
येथील कन्या शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला आरंभ झाला. शाळेच्या विद्यार्थिनी कु. संस्कृती पवार, कु. शुभ्रा नाळे आणि कु. ऐश्वर्या निकम यांनी महर्षी कर्वे यांचे बालपण, कार्य आणि मिळालेले पुरस्कार यांविषयी मनोगत व्यक्त केले.
या वेळी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा दौंडे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की, महर्षी कर्वे यांनी समाजोन्नतीचा जो विचार दिलेला आहे, तो आपण पुढे दृढ ठेवला पाहिजे. यासाठी सातत्याने सकारात्मक राहून प्रयत्न करायला हवेत.