सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने…

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तमिळनाडू येथील साधकांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ७९ व्‍या  जन्‍मोत्‍सवाच्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती

१. श्रीमती बी. कृष्‍णावेणी, मदुराई (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ७० वर्षे)

श्रीमती बी. कृष्‍णावेणी

१ अ. जन्‍मोत्‍सवाचा कार्यक्रम पहात असतांना शारीरिक वेदना न्‍यून होणे आणि कार्यक्रमाच्‍या शेवटी हृदय प्रफुल्लित होऊन मन हलके होणे अन् आनंद जाणवणे : ‘२.५.२०२१ या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्‍मोत्‍सव सोहळा होता. त्‍या दिवशी माझ्‍या पोटात तीव्र वेदना होत असल्‍याने मला काहीच खाता येत नव्‍हते. त्‍यामुळे मी सौ. स्‍वर्णाकडून (माझ्‍या मुलीकडून) श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी दिलेली (पलानी येथील मुरुगा देवाच्‍या मंदिरातील) विभूती मागून घेतली आणि ती पाण्‍यात घालून ते पाणी प्‍यायले. जन्‍मोत्‍सवाचा कार्यक्रम पहात असतांना माझ्‍या वेदना न्‍यून होऊन काही वेळाने त्‍या पूर्णपणे थांबल्‍या. श्री. विनायक शानभाग (आताची आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के) गुरुदेवांविषयी बोलत असतांना अकस्‍मात् माझा शरणागतभाव जागृत होऊन माझे डोळे अश्रूंनी भरून आले. त्‍यानंतर मी योग्‍य प्रकारे व्‍यष्‍टी आणि समष्‍टी प्रार्थना करू शकले. कार्यक्रमाच्‍या शेवटी माझे हृदय प्रफुल्लित होऊन मन हलके झाले होते आणि मला आनंद जाणवत होता. संपूर्ण कार्यक्रमात गुरुदेवांचे छायाचित्र जिवंत वाटून ते स्‍मितहास्‍य करत असल्‍याचे मला जाणवत होते.

२. सौ. सुधा गोपालकृष्‍णन् (वय ४४ वर्षे)

सौ. सुधा गोपालकृष्‍णन्

२ अ. यजमानांची मनःस्‍थिती ठीक नसतांना त्‍यांनी अचानक कार्यक्रम बंद करणे आणि प्रार्थना केल्‍यावर त्‍यांनी पुन्‍हा जोडणी करून देणे : मी जन्‍मोत्‍सवाच्‍या दिवशी वास्‍तूशुद्धी करून कार्यक्रम पहायला बसले होते. अचानक माझे यजमान तिथे आले आणि त्‍यांनी कार्यक्रम बंद केला. त्‍या वेळी त्‍यांची मनःस्‍थिती ठीक नव्‍हती. घडलेल्‍या प्रसंगामुळे मला पुष्‍कळ अपराधी वाटले आणि खंतही वाटली. मी तशाच स्‍थितीत प्रार्थना करत होते. थोड्या वेळाने माझ्‍या यजमानांनी स्‍वतःहून कार्यक्रम पहाण्‍यासाठीची जोडणी करून दिली आणि तो संपेपर्यंत कोणताही अडथळा आणला नाही.

२ आ. कार्यक्रमाच्‍या २ दिवस आधीपासून कोणतेही कारण नसतांना मला आतून पुष्‍कळ आनंद जाणवणे : मी सेवेत अधिक कार्यरत नसतांनाही गुरुदेवांनी मला दर्शन दिले, त्‍याबद्दल मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटते. कार्यक्रमाच्‍या २ दिवस आधीपासून कोणतेही कारण नसतांना मला आतून पुष्‍कळ आनंद जाणवत होता. सौ. कल्‍पना बालाजी यांनी मला जन्‍मोत्‍सव कार्यक्रमाविषयी सांगितल्‍यावर त्‍यामागचे कारण समजले.

३. श्रीमती कलैवाणी, मदुराई

श्रीमती कलैवाणी

३ अ. ‘लुकलुकणारा तेजस्‍वी तारा म्‍हणजे गुरुदेवच आहेत’, असे साधिकेच्‍या मुलीला वाटणे : जन्‍मोत्‍सवाचा कार्यक्रम आटोपल्‍यावर त्‍या रात्री मी आणि माझी मुलगी कु. काव्‍या (वय १० वर्षे) आगाशीत फेर्‍या मारत होतो. तेव्‍हा आम्‍हाला एक तेजस्‍वी तारा लुकलुकतांना दिसला. ‘तो तारा म्‍हणजे गुरुदेवच आहेत’, असे काव्‍याला वाटले. तार्‍याकडे पहातांना मला पुष्‍कळ आनंद वाटत होता.’


गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्‍म्‍य आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्‍याचा भावार्थ !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘तस्‍मै श्री गुरवे नमः ।’
संपूर्ण चराचरात व्‍याप्‍त असलेल्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी कोटीशः नमन !
‘अखण्‍डमण्‍डलाकारं व्‍याप्‍तं येन चराचरम् ।
तत्‍पदं दर्शितं येन तस्‍मै श्रीगुरवे नमः ॥ – गुरुगीता, श्‍लोक ६७

अर्थ : ज्‍याने हे चराचर, खंडित न होणारे वलयाकार मंडळ (ब्रह्मांड) व्‍यापले आहे, त्‍या ब्रह्मपद दाखवणार्‍या श्री गुरूंना नमस्‍कार असो.’

भावार्थ : ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्म अस्‍तित्‍व चराचरात सामावले आहे. ‘त्‍यांचे अस्‍तित्‍व नाही’, असे एकही स्‍थान या जगतात नाही; कारण ते साक्षात् परब्रह्मच आहेत. सारे जग परब्रह्मस्‍वरूप श्री गुरूंच्‍या लयाकार प्रभावळीतच सामावले आहे. आपण सर्व जण त्‍यांच्‍याच चैतन्‍याच्‍या वलयात रहातो. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या परम चैतन्‍याच्‍या प्रभावळीच्‍या स्‍पर्शाने आम्‍हा साधकांमधील आत्‍मचैतन्‍य जागृत व्‍हावे’, अशी त्‍या सर्वव्‍यापी गुरुतत्त्वाला कोटीशः नमनपूर्वक प्रार्थना !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (३०.४.२०२३)


परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना  साधनेविषयी केलेले अमूल्‍य मार्गदर्शन !

प्रारब्‍ध आणि अनिष्‍ट शक्‍तींचा त्रास ही दुःखाची प्रमुख कारणे आहेत !

कु. मिल्‍की अगरवाल : देवाचे स्‍मरण करण्‍यात आनंद मिळतो, तर दुःख का होते ?

परात्‍पर गुरु डॉ. आठवले : याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्‍हणजे प्रारब्‍ध आणि दुसरे कारण, म्‍हणजे तुम्‍ही साधना करता, ते अनिष्‍ट शक्‍तीला आवडत नाही. अनिष्‍ट शक्‍तीला वाटते, ‘तुम्‍ही आमच्‍या (अनिष्‍ट शक्‍तींच्‍या) नियंत्रणात आहात आणि तुम्‍ही साधना केली, तर आमचे तुमच्‍यावर असलेले नियंत्रण सुटेल.’ अनिष्‍ट शक्‍तींना व्‍यक्‍तीवरील नियंत्रण सोडायचे नसते. त्‍यामुळे त्‍या तुम्‍हाला त्रास देऊन तुमच्‍या साधनेत अडथळा आणतात.


परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या कालावधीत साधिकेला आलेल्‍या अनुभूती

‘२२.५.२०२२ या दिवशी परात्‍पर गुरुदेव डॉ. आठवले यांचा ८० वा जन्‍मोत्‍सव साजरा झाला. त्‍याच्‍या १ मास (महिना) आधीपासून माझ्‍या मनाच्‍या स्‍थितीत पालट जाणवून मला काही अनुभूती आल्‍या आणि देवाने काही गोष्‍टी माझ्‍या लक्षात आणून दिल्‍या. त्‍या पुढे दिल्‍या आहेत.

नंदिता वर्मा

१. स्‍वप्‍नात भावस्‍थिती अनुभवणे आणि त्‍या वेळी ‘ईश्‍वरप्राप्‍तीची तळमळ वाढली आहे’ असे जाणवणे 

जन्‍मोत्‍सवाच्‍या साधारण एक मासापूर्वी (महिन्‍यापूर्वी) मला रात्री झोपेत एक स्‍वप्‍न पडले. स्‍वप्‍नात मला दिसले, ‘माझे मन प.पू. गुरुदेवांकडे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याकडे) धावत आहे. माझा भाव जागृत होऊन माझ्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू वहात आहेत आणि त्‍या भावस्‍थितीत माझी ईश्‍वरप्राप्‍तीची तळमळ वाढली आहे.’ मी हे स्‍वप्‍न रात्रभर पाहिले. सकाळी उठल्‍यावर ‘ते स्‍वप्‍न नसून सर्व खरे होते’, असे मला जाणवले.

२. दुसर्‍या स्‍वप्‍नात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे स्‍वरूप पुष्‍कळ मोठे असल्‍याचे दिसणे आणि त्‍यांना ‘मला तुमच्‍याविना काही नको’, अशी प्रार्थना करणे

जन्‍मोत्‍सवाच्‍या १० दिवस आधी मला स्‍वप्‍नात ‘परात्‍पर गुरुदेवांचे स्‍वरूप पुष्‍कळ मोठे आहे’, असे दिसले. मी स्‍वप्‍नात त्‍यांचे चरण धरून रडत होते आणि ‘मला तुमच्‍याविना काही नको. मला तुमचे चरण हवे आहेत. प्रत्‍येक जन्‍मात मला तुमच्‍या समवेत रहायचे आहे’, अशी प्रार्थना करत होते. मी हे स्‍वप्‍न पूर्ण रात्र पाहिले.

३. ही दोन्‍ही स्‍वप्‍ने पडल्‍यानंतर ‘परात्‍पर गुरुदेव माझ्‍यामध्‍ये काहीतरी पालट करून घेत आहे आणि जे काही होत आहे ते शरीर, मन अन् बुद्धी यांच्‍या पलीकडे आहे’, असे मला जाणवले.

४. श्रीविष्‍णूच्‍या छायाचित्राविषयी आधी कधी न अनुभवलेली ओढ जाणवणे 

मी माझ्‍या भ्रमणसंगणकाच्‍या (लॅपटॉपच्‍या) पडद्यावर (स्‍क्रीनवर) कुठलेही चित्र ठेवत नाही; पण जन्‍मोत्‍सवाच्‍या १ आठवडा आधीपासून मी पडद्यावर श्रीविष्‍णूचे चित्र ठेवले होते. सेवा करतांना अधूनमधून मी त्‍या चित्राकडे बघायचे. तेव्‍हा त्‍याविषयी ‘आधी कधी अनुभवली नाही’, अशी ओढ मला जाणवली.

५. जन्‍मोत्‍सवाच्‍या आधी‘प.पू. गुरुदेवांच्‍या भावलहरी स्‍वतःकडे येत आहेत’, असे जाणवणे, एक वेगळे भावविश्‍व अनुभवणे आणि तेच खरे असल्‍याचे जाणवणे

जन्‍मोत्‍सवाच्‍या ४ दिवस आधी सकाळी मी घरी असतांना ‘प.पू. गुरुदेवांच्‍या भावलहरी माझ्‍याकडे येत आहेत’, असे मला जाणवले आणि माझा भाव जागृत झाला. ही स्‍थिती १ घंटा टिकली. या स्‍थितीमध्‍ये मी सर्व विसरले आणि ‘केवळ ही भावस्‍थिती आणि मी त्‍या वेळी करत असलेली सेवा’, यांकडे माझे लक्ष होते. ‘मी एका वेगळ्‍या विश्‍वात आहे. हे भावविश्‍वच खरे आहे आणि अन्‍य सर्व खोटे आहे’, असे मला जाणवले.

६. जन्‍मोत्‍सवाच्‍या आधी ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडून येणार्‍या चैतन्‍यलहरी निर्गुणातून सगुणात आलेल्‍या आहेत’, असे जाणवणे

जन्‍मोत्‍सवाच्‍या ४ दिवस आधीपासून ‘प.पू. गुरुदेवांकडून येणार्‍या चैतन्‍याच्‍या लहरी रामनाथी आश्रमाकडून मी सेवा करत असलेल्‍या ठिकाणी येत आहेत’, असे मला जाणवत होते आणि माझा भाव जागृत होत होता. असे मी या आधी कधी अनुभवले नव्‍हते. त्‍या वेळी ‘प.पू. गुरुदेवांकडून येणार्‍या चैतन्‍याच्‍या लहरी निर्गुणातून सगुणात आलेल्‍या आहेत’, असे मला जाणवले.

 ७. रथोत्‍सवाच्‍या दिवशी सनातनच्‍या तीनही गुरूंचे दर्शन झाल्‍यावर भाव जागृत होणे आणि कृतज्ञता वाटणे

रथोत्‍सवाच्‍या दिवशी साक्षात् परात्‍पर गुरु डॉक्‍टर, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून माझा भाव जागृत झाला. त्‍या वेळी ‘प.पू. गुरुदेवांनी माझ्‍यासाठी पुष्‍कळ केले आहे आणि माझे कठोर प्रारब्‍ध न्‍यून करून ते माझ्‍याकडून साधना करून घेत आहेत’, या विचारांनी माझ्‍या डोळ्‍यांतून अश्रू वहात होते. त्‍या वेळी मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.

या सर्व अनुभूती प.पू. गुरुदेवांच्‍या चरणी अर्पण ! ‘त्‍यांच्‍यामुळे मला ही स्‍थिती अनुभवता आली’, याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– नंदिता वर्मा, कवळे, फोंडा, गोवा. (१२.२.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक