उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंडांचा अंत आणि चरफडणारे धर्मनिरपेक्षतावादी !
१. कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येनंतर सामान्य जनता आनंदी !
‘राजकारणात हात घालणारा उत्तरप्रदेशचा कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ हे दोघेही मातीमध्ये मिसळले आहेत, तरीही त्यांचे सहस्रो कोटी रुपयांचे काळे साम्राज्य अद्यापही जिवंत आहे. दहशत आणि भीती यांना पर्यायी शब्द बनलेले अतिक अन् अश्रफ यांच्या केवळ गोष्टी उरल्या आहेत. या हत्यांमागे अनेक गुपिते दडली आहेत आणि अनेक नवीन शंकाही निर्माण झाल्या आहेत.
अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येची बातमी माध्यमांमध्ये आली, तेव्हा ‘पोलीस बंदोबस्तामध्ये अशा प्रकारे घटना घडायला नको होती’, असे एकदा वाटून गेले. तसेच ‘हा पोलीस प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणा यांचा अक्षम्य निष्काळजीपणा आहे’, असेही वाटले; पण जसजसा काळ पुढे सरकत आहे आणि त्यांच्या गुन्हेगारी कथा अन् क्लेशदायक घटना समोर येत आहेत, तसतसे ‘जे काही घडले ते चांगल्यासाठीच घडले’, असे आता सामान्य जनता म्हणू लागली आहे.
२. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अडचणीत आणण्याचे षड्यंत्र अयशस्वी !
कुख्यात गुंड अतिकवर १०१ आणि त्याचा भाऊ अश्रफ याच्यावर ५२ खटले चालू होते. त्यांपैकी एका प्रकरणात अतिक याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि इतर प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा व्हावी; म्हणून ‘रिमांड’वर (कोठडीत) चौकशी चालू होती. सूत्रांवर विश्वास ठेवला, तर दोघेही शिक्षेच्या भीतीने काही गुपिते लपवत होते. अतिकला सर्व १०१ प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा झाली असती कि नाही ? हे कटू सत्य होते; कारण तो राजकीयदृष्ट्या संरक्षण मिळालेला गुंड होता, तसेच स्वतः एक वेळा खासदार आणि ४ वेळा आमदार राहिला होता.
अतिक आणि अश्रफ यांची हत्या सुनियोजित षड्यंत्राखाली झाली आहे, यात शंका नाही; कारण अतिकचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’शी असलेले संबंध उघड होऊ लागले होते. त्यांचे धागेदोरे विरोधी पक्षातील काही बड्या नेत्यांशी जोडले जाण्याची शक्यता होती. अतिक आणि अश्रफ यांची हत्या करून षड्यंत्रकर्त्यांना मोठी खेळी खेळायची होती; पण आता ती विरोधी पक्ष आणि कट रचणारे यांच्या विरोधात जात आहे. ‘अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्य दंगलीत होरपळून निघेल अन् योगी आदित्यनाथ यांचे सरकार कमकुवत होईल. त्यामुळे त्यांना नैतिकतेच्या आधारावर त्यागपत्र द्यावे लागेल आणि राज्यात राष्ट्र्रपती राजवट लागू होईल’, असे या लोकांना वाटत होते; परंतु उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तत्परता अन् प्रशासकीय कार्यक्षमता यांमुळे राज्यात कुठेही तणाव नसून सर्वत्र शांतता आणि समाधान आहे.
अतिक आणि अशरफ यांच्या मृत्यूवर रडणारे स्वार्थी धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष कुख्यात गुंड अतिक अहमदसाठी ‘जी’ हा शब्द वापरत आहेत. ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसीसारखे लोक त्या धोकादायक गुन्हेगाराला ‘माननीय मुसलमान खासदार’ म्हणून गौरवत आहेत आणि त्या आडून अतिकचे गुन्हे अल्प करण्याचा प्रयत्न करून स्वत:ची राजकीय पोळी भाजत आहेत. असे केल्याने राज्यातील योगी सरकारची प्रतिमा डागाळता येईल, असे या सर्व राजकीय पक्षांना वाटत आहे. उलट अशा कारवायांमुळे भाजप अधिक सबळ होत आहे आणि योगी यांची प्रतिमा ‘कठोर प्रशासक’ म्हणून पुढे येत आहे.
३. कुख्यात गुंड अतिक अहमदची लोकांमध्ये दहशत !
अतिक अहमद हा अतिशय क्रूर गुंड होता. तो त्याच्या विरोधकांना शांत करण्यासाठी हत्या आणि अपहरण यांसारख्या घटना घडवत असे. अतिकने भीतीचे साम्राज्य उभे केले होते. त्याची दहशत एवढी होती की, अतिकशी संबंधित प्रकरण उच्च न्यायालयात गेले, तेव्हा न्यायाधीशही त्या खटल्याची सुनावणी घेण्यास नकार देत असे. आज कुणी काहीही म्हणत असले, तरी त्या न्यायमूर्तींना कुठेतरी आनंद वाटत असेल. अतिक अहमद याने त्याच्या घराच्या आजूबाजूच्या हिंदूंना घरे रिकामी करण्याचा आदेश दिला होता. त्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव होते. तेव्हा ‘हिंदूंनी स्मशानभूमीच्या जागेवर ताबा घेऊन घरे बांधली आहेत’, असे अतिक म्हणाला होता. अतिकच्या आदेशाविषयी घरांचे मालक पोलिसांकडे गेले; पण त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. प्रयागराज आणि त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांतील रहिवाशांचे म्हणणे आहे की, समाजवादी पक्षाच्या राजवटीत अतिक अन् त्याचे गुंड यांची भीती इतकी वाढली होती की, महिला आणि मुली त्याच्या भागातून जाण्यासही घाबरत होत्या. हे लोक केवळ हिंदु समाजातील महिला आणि मुलीच नाही, तर अतिक याचे गुंड मुसलमान समाजातील मुलींचाही विनयभंग अन् बलात्कार करत होते. विशेष म्हणजे त्या निष्पाप मुलींची कुठेही सुनावणी होत नव्हती. आज त्या मुलींना खरा न्याय मिळाला आहे आणि त्या जेथे असतील, तेथे आनंद साजरा करत असतील.
४. धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांकडून अतिक अहमदचे उदात्तीकरण
असे असतांना तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष सतत लोकभावनांच्या पलीकडे जाऊन रडत आहेत आणि अतिकच्या नावावर त्यांची मुसलमान मतपेढी मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत. ते हेच पक्ष आहेत, जे पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येवर गप्प बसले होते. हे तेच लोक आहेत, जे लक्ष्मणपुरीमध्ये घरात घुसून मारलेल्या कमलेश तिवारीच्या हत्येवर गप्प बसतात आणि त्याचा निषेधही करत नाहीत. हे लोक राजस्थानमधील कन्हैयालालपासून महाराष्ट्रातील उमेश कोल्हेपर्यंतच्या हत्याकांडावर गूढ मौन धारण करतात; पण हेच पक्ष धोकादायक गुंड अतिक आणि अश्रफ यांना ‘जी’ अन् ‘सन्माननीय मुसलमान खासदार’ असे शब्द वापरून केवळ मतपेढीसाठी त्यांचे उदात्तीकरण करतात. त्यांची ही खेळी आता यशस्वी होणार नाही. अखिलेशचे ठीक आहे; पण बसपच्या नेत्या मायावती यांनी उत्तरप्रदेशातील अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येवर ज्या प्रकारे दु:ख व्यक्त केले अन् टीका केली, ते आश्चर्यकारक आहे; कारण मायावतींच्या विरोधात ‘गेस्ट हाऊस प्रकरण’ घडवून आणणारा अतिक अहमद होता.
५. शेवटी पाल कुटुंबियांना खरा न्याय मिळाला !
अतिक अहमद याने वर्ष २००५ मध्ये दलित नेते आणि बहुजन समाज पक्षाचे माजी आमदार राजू पाल यांची हत्या केली होती; कारण ते अतिकचा भाऊ अश्रफ याच्या विरोधात निवडणूक जिंकून आमदार बनले होते, तसेच ते अतिशय सामान्य कुटुंबातून आले होते. आमदार झाल्यानंतर राजू पाल यांनी अतिकचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याला दूरभाष करून आशीर्वाद मागितले होते. तेव्हा अतिकने त्यांना ‘आमदार झाला आहे; पण आता जिवंत राहून दाखव’, असे उत्तर दिले होते. त्याप्रमाणे एके दिवशी राजू पाल यांची हत्या झाली आणि आता त्या घटनेचा साक्षीदार असलेल्या अधिवक्ता उमेश पाल यांचीही हत्या करण्यात आली. बसपचे माजी आमदार राजू पाल यांचे कुटुंब १८ वर्षांपासून न्याय मागत होते. या कालावधीत समाजवादी पक्ष आणि बसप या दोन्ही पक्षांची सरकारे आली; पण मागासवर्गीय अन् दलित यांच्या नावावर मते मागणाऱ्या या पक्षांनी राजू पाल यांच्या कुटुंबाला कधीच न्याय दिला नाही; पण आता त्याच्या कुटुंबियांना नैसर्गिक न्याय मिळाला आहे.
६. भयावह गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यामुळे कायद्याचे राज्य !
आता राज्यात कायद्याचे राज्य असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. योगी स्पष्टपणे म्हणतात, ‘पूर्वी राज्यासाठी समस्या बनलेले कुख्यात गुंड आता स्वतःच अडचणीत आले आहेत.’ हे खरे आहे; कारण वर्ष २०१२ ते २०१७ या काळात राज्यात ७०० हून अधिक दंगली झाल्या, तसेच वर्ष २००२ ते २००७ या काळात ३६४ हून अधिक दंगली झाल्या; मात्र योगी यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर वर्ष २०१७ ते २०२३ पर्यंत राज्यात कुठेही दंगल झाली नाही आणि कुठेही संचारबंदी लागली नाही. राज्यातील जनता आज आनंदी आहे; कारण बऱ्याच काळानंतर असे सरकार राज्यात आले आहे, जे गुन्हेगार आणि कुख्यात गुंड यांना नेस्तनाबूत करू पहात आहे. आज समाजातील एक वर्ग अतिक आणि अश्रफ यांची हत्या, त्यांच्या टोळीची चकमक अन् अटक यांचा आनंद साजरा करत आहे, जे एकेकाळी त्यांच्या भयानक अत्याचारांना सामोरे गेले होते.’
– मृत्युंजय दीक्षित
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, हिंदी)
संपादकीय भूमिकासमाजद्रोही गुन्हेगार अतिक अहमद याच्यासाठी अश्रू ढाळणाऱ्या ‘धर्मनिरपेक्ष’ पक्षांचा राजकीय अंत:काळ समीप आला आहे, यात काय आश्चर्य ! |