नास्तिकतावाद्यांच्या हत्येच्या भरकटलेल्या अन्वेषणाची पोलखोल !

‘न रॅशनलिस्ट मर्डर्स’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा !

The Rationalist Murders_Cover  : ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ

मुंबई, ३० एप्रिल (वार्ता.) – मागील काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम्.एम्. कलबुर्गी या नास्तिकतावाद्यांच्या गोळ्या घालून हत्या झाल्या. या चारही प्रकरणांत तपासयंत्रणांनी ज्या प्रकारे तपास केला, त्यात कुठेही ताळमेळ आणि तर्क दिसला नाही. उलट हा तपास भरकटला होता. यामध्ये काही हिंदुत्वनिष्ठांना कारागृहात डांबण्यात आले; मात्र इतक्या वर्षांत यांतील एकाही हत्येच्या अंतिम निष्कर्षापर्यंत अन्वेषण यंत्रणा पोचू शकलेली नाही. उलट वारंवार पालटणाऱ्या अन्वेषणामुळे या हत्यांचा तपास पुरता भरकटला. न्यायालयानेच अनेकदा भरकटलेल्या अन्वेषणाविषयी तपासयंत्रणांवर ताशेरे ओढले. या हत्यांनंतर हिंदुत्वनिष्ठांचे अटकसत्र, भरकटून टाकण्यात आलेले अन्वेषण यांविषयी आतापर्यंत उजेडात न आलेल्या तथ्यांवर सुप्रसिद्ध डॉ. अमित थडानी यांनी वस्तुनिष्ठ, निष्पक्षपाती आणि सडेतोड लिखाण केले आहे. त्यांच्या ‘न रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन २९ एप्रिल या दिवशी मान्यवरांच्या हस्ते झाले.

उपस्तिथ हिंदुत्वनिष्ठ व मान्यवर

प्रकाशन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांनी केलेली भाषणे

खोट्या गुन्हांत अडकवलेल्या हिंदूंच्या अपकीर्तीचे षड्यंत्र हे पुस्तक उघड करते ! – रतन शारदा, लेखक आणि इतिहासतज्ञ

श्री. रतन शारदा

हिंदु आणि हिंदुत्व यांवर कोणत्याही पुराव्यांविना आरोप करण्यात आले. ‘भगवा आतंकवाद’ म्हणून हिंदूंना लक्ष्य केले जाते. हिंदूच विवेकवादी आहेत. ते चर्चेसाठी नेहमीच सिद्ध असतात; परंतु काही गुन्ह्यांमध्ये हिंदूंना अडकवून हिंदुत्वाची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र काहींकडून चालू आहे. बागेश्वरधामविषयी बोलले जाते; परंतु चंगाई सभांद्वारे हिंदुविरोधी कट चालू आहेत, त्यांविषयी मात्र बोलले जात नाही. ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकामध्ये लेखकाने अत्यंत खोलवर विचार मांडले आहेत. पुस्तकात एकूण ८३१ संदर्भ देण्यात आले आहेत. हिंदूंवर वेळोवेळी झालेल्या अन्यायाला या  पुस्तकातून वाचा फोडण्यात आली आहे. आम्ही डॉ. अमित थडानी यांच्या पाठीशी आहोत.

समजा कपिल सिब्बल यांना अटक झाली तर ?… – डॉ. अमित थडानी, लेखक

डॉ. अमित थडानी

‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ हे पुस्तक लिहिण्यासाठी शेकडो संदर्भ पडताळले आणि १० सहस्रांहून अधिक पानांची २ आरोपपत्रे वाचली. एकंदरीत तपासातील अनेक त्रुटी, गरीब आणि सामान्य घरातील युवकांना गोवण्याचे षड्यंत्र, तसेच विरोधी विचारसरणी असणाऱ्या संस्थेची अपकीर्ती करण्याचे प्रयत्न या पुस्तकात मांडले आहेत. सामान्य घरातील मुलांना कारागृहात डांबण्यात आले.‘मिडिया ट्रायल’ घेऊन कोण कुठे भेटले, कुठे प्रशिक्षण दिले वगैरे निनावी सूत्रांच्या आधारे बातम्या दाखवण्यात आल्या. आरोपींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिवक्त्याला कटाचा एक भाग म्हणून अटक करण्यात आली. तुम्ही परिस्थितीची कल्पना करू शकता का ? कपिल सिब्बल, इंद्रजित सिंह यांसारख्या अधिवक्त्यांना अटक झाली, तर किती खळबळ माजेल; मात्र आरोपींच्या अधिवक्त्यांना अटक करण्यात आली, तेव्हा काहीच झाले नाही.

हिंदूंनी सत्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे ! – केतकी चितळे, अभिनेत्री

अभिनेत्री केतकी चितळे

प्रसारमाध्यमांकडून ठराविक मते मांडली जातात. त्याद्वारे एक मतप्रवाह निर्माण केला जातो. प्रसारमाध्यमांवर दाखवलेल्या माहितीवरून मत सिद्ध करून माणूस पुढे जातो. या पुस्तकात मात्र न्यायालयात काय घडले, अन्वेषण कसे झाले ? याविषयी तथ्ये दिली आहेत. ‘मी भले आणि माझे घर भले’, अशा वृत्तीच्या लोकांसाठी नाही; मात्र ज्यांना सनातनी हिंदू म्हणून सत्य जाणून घ्यावयाचे आहे, त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे.

भरकटलेल्या अन्वेषणाविषयी प्रश्न विचारण्याचे धाडस हे पुस्तक करते ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकरडॉ. दाभोलकर, कुलबर्गी, गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या अन्वेषणात अनेक चुका झाल्या आहेत. डॉ. अमित थडानी यांनी त्याविषयी प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य या पुस्तकातून दाखवले आहे. गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगली झाल्या. त्या हत्याकांडाचा ‘मास्टर माईंड’ निर्दोष सुटला, हे अनेकांना ठाऊकही नाही. त्याविषयी कुठे भाष्य होत नाही; मात्र बेस्ट बेकरी प्रकरणात २ हिंदु आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना निर्दाेष ठरवले. त्या वेळी मात्र तिस्ता सेटलवाड आकांडतांडव करून तथाकथित मानवाधिकार आयोगाकडे गेल्या. मानवाधिकार आयोगाच्या विनंतीनंतर न्यायालयाने हा खटला पुन्हा चालू करण्याचा आदेश दिला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ठिपसे यांच्या खंडपिठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायमूर्ती ठिपसे पुढे काँग्रेसमध्ये गेले. या प्रकरणात २ जणांचा कारागृहात मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांना जामीन मिळावा, यासाठी आम्ही न्यायालयात गेलो; परंतु आम्हाला सुनावणी असल्याचेच सांगण्यात आले. याच कालावधीत नक्षलवादी कारवायांच्या आरोपाखाली अटक झालेल्या सुधा भारद्वाज यांच्यासह कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपींना मात्र जामीन मिळाला, ही शोकांतिका नाही का ? प्रसारमाध्यमांवर आलेल्या बातम्यांवर आपण विश्वास ठेवतो. या पुस्तकामध्ये सत्य मांडण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे वाचन करण्याची नितांत आवश्यकता आहे.

कम्युनिस्ट विचारांच्या नक्षलवाद्यांनी ४० सहस्रांपेक्षा जास्त हत्या केल्या, त्याची चर्चा नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

डॉ. थडानी यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे प्रारंभ आहे. दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे आणि गौरी लंकेश या चार हत्यांच्या तपासात बऱ्याच चुकीच्या गोष्टी तपासयंत्रणांकडून झाल्या आहेत, त्यावर प्रश्न विचारण्याची हिंमत या पुस्तकाचे लेखकांनी दाखवली आहे. खरे तर असे प्रश्न विचारण्याची हिंमत आपण कधी केलीच नव्हती. यातून भगवा आतंकवाद सिद्ध करण्याचा प्रयत्न होता. प्रत्यक्षात कम्युनिस्ट विचारांच्या नक्षलवाद्यांनी ४० सहस्रांपेक्षा जास्त हत्या केल्या, त्याची कुठेही चर्चा होतांना दिसत नाही.