स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनचरित्र म्हणजे धगधगत्या यज्ञकुंडातील ज्वाळा ! – राहुल सोलापूरकर, ज्येष्ठ अभिनेते
पुणे येथील ‘मॉडर्न शैक्षणिक संकुला’त आयोजित वसंत व्याख्यानमाला
पिंपरी (जिल्हा पुणे) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनचरित्र हे धगधगत्या यज्ञकुंडातील ज्वाळेसमान होते. त्यांच्या स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म, स्वनिष्ठा या विचारांशी समर्पित होऊन त्याप्रमाणे आचरण केले गेले पाहिजे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले. ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या निगडीतील ‘मॉडर्न शैक्षणिक संकुला’त आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनचरित्र’ या विषयावर ते बोलत होते. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. या वेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष डॉ. अरविंद पांडे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूरकर पुढे म्हणाले की, हुतात्मा चाफेकर बंधूंचे बलीदान आणि काळकर्ते शिवराम हरि परांजपे यांच्याकडून प्रेरणा घेऊन सावरकरांनी स्वतःला स्वातंत्र्ययुद्धात समर्पित केले. सशस्त्र क्रांतीची शपथ घेऊन त्यांनी पुढे ‘अभिनव भारत’ संघटनेच्या माध्यमातून कार्य चालू केले. त्यांचा ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ सर्वार्थाने प्रेरणादायी ठरला.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्यवीर सावरकरांच्या असीम देशभक्तीचा आदर्श प्रत्येकाने स्वतःपुढे ठेवला, तर राष्ट्रभक्त पिढी निर्माण होईल ! |