महाराष्ट्र दिनापासून राज्यातील बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी एस्.टी. महामंडळ विशेष मोहीम राबवणार !
|
मुंबई – राज्यातील बसस्थानकांची स्वच्छता करण्यासाठी एस्.टी. महामंडळाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र दिनापासून (१ मे पासून) या मोहिमेला प्रारंभ करण्यात येणार आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ने राज्यातील बसस्थानकांच्या दुरावस्थेची वृत्तमाला सलग प्रसिद्ध करून त्यामध्ये परिसरात उकिरड्याप्रमाणे टाकण्यात येणारा कचरा, प्रसाधनगृहांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची असुविधा, चालक-वाहक यांच्या निवासस्थानांची दुरावस्था, बंद पडलेली उपाहारगृहे, तुटलेली बाकडी, जळमटे आच्छादलेली छते, धुळीने माखलेल्या भिंती, पान-तंबाखू यांच्या पिचकार्यांनी रंगलेल्या भिंती अशा प्रकारची बसस्थानकांची दुरवस्था छायाचित्रांसह उघड करून एस्.टी. महामंडळाच्या बसस्थानक स्वच्छता मोहिमेचा फोलपणा समोर आणला. यामध्ये एस्.टी. महामंडळाला बसस्थानक स्वच्छता मोहीम परिणाकारक आणि प्रामाणिकपणे राबवण्याचे आवाहन करण्यात आले होते. याचा परिणाम म्हणजे एस्.टी. महामंडळाने बसस्थानकांची स्वच्छता समयमर्यादेमध्ये पूर्ण करण्याची, तसेच बसस्थानकांची पहाणी करण्याचे नियोजन केले आहे.
एस्.टी. महामंडळाच्या बसस्थानक स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत जून २०२४ पर्यंत राज्यातील सर्व बसस्थानकांची स्वच्छता करून त्यांची पहाणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्वच्छ बसस्थानकांना विभागानुसार महामंडळाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. बसस्थानकांची स्वच्छता राखून प्रवाशांना एस्.टी.कडे आकर्षित करण्यासाठी महामंडळ प्रयत्न करणार आहे. राज्यातील सर्व ५८० बसस्थानकांवर ही मोहीम राबवली जाणार आहे.
राज्यातील १६ बसस्थानकांची दुरावस्था केली उघड !
सोलापूर, देवगड, सावंतवाडी, राजापूर, खेड, दापोली, रत्नागिरी, भुसावळ, जळगाव, कराड, सातारा, सांगली, स्वारगेट, आर्णी, वणी, अमरावती या १६ बसस्थानकांची वृत्ते छायाचित्रासह दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.
…यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ ने घेतली मोहीम !
एस्.टी.च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एस्.टी. महामंडळाने ‘बसस्थानक स्वच्छता’ मोहीम हाती घेतली. ही मोहीम राबवण्यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: अधिकार्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. मोहीम चालू करून ४ मास होऊनही राज्यातील बसस्थानके अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळून आले. घोषणा करूनही प्रत्यक्षात स्वच्छता मोहीम राबवली जात नसल्याचा प्रकार लक्षात आल्यामुळे मोहिमेचे खरे स्वरूप उघड करण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ही वृत्तमाला चालू करण्यात आली.
परिवहनमंत्री आणि महामंडळ यांना ‘ट्विटर’वरून टॅग !
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली ही सर्व वृत्ते परिवहनमंत्री एकनाथ शिंदे आणि एस्.टी. महामंडळ यांना ‘ट्विटर’द्वारे टॅग करून बसस्थानकांच्या दुरावस्थेची छायाचित्रे त्यांच्यापर्यंत पोचवण्यात आली.
परिवहनमंत्री आणि अधिकारी यांना वृत्ते सादर !
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची नोंद घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत एस्.टी. महामंडळाच्या बसस्थानक स्वच्छता मोहिमेचे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सर्व वृत्ते परिवहनमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन विभागाचे सचिव, तसेच एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना सादर करण्यात आली.
नागरिकांनो, बसस्थानकांची स्वच्छता राखण्यास योगदान द्या !
अनेकदा प्रवासी कचरा हा कचराकुंडीत न टाकता बसस्थानकांवर इतरत्र फेकतात, बसस्थानकांच्या भिंतींवर पान-तंबाखू खाऊन थुंकतात. यांमुळे बसस्थानके अस्वच्छ होतात. बसस्थानके ही सार्वजनिक म्हणजेच आपली संपत्ती आहे, हे लक्षात घेऊन त्यांची स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
यासह एस्.टी. कर्मचारीही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असतील, तर अशा अस्वच्छ बसस्थानकांची छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि दैनिक ‘सनातन प्रभात’साठी या ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सअप’ क्रमांकावर पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा !
हे पण वाचा : सनातन प्रभात
#Exclusive : ‘तुंबलेली मुतारी आणि त्यातून बाहेर सोडण्यात आलेली घाण’ असे स्वच्छतेचे सोयरसुतक नसलेले आर्णी (यवतमाळ) बसस्थानक !