शेतकर्यांच्या पडक्या भूमीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून ७ सहस्र मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ! – विश्वास पाठक, महावितरणचे स्वतंत्र संचालक
पुणे – शेतकर्यांच्या पडक्या भूमीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून वर्ष २०२५ पर्यंत ७ सहस्र मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. त्यासाठी २८ सहस्र एकर भूमीवर हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यातून शेतकर्यांना उत्पन्नही मिळेल आणि स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार आहे. राज्यातील ३० टक्के कृषी ‘फीडर्स’ सौर ऊर्जेवर चालवण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे ‘मिशन २०२५’ चालू केले आहे, असे महावितरणचे स्वतंत्र संचालक आणि भाजपचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सांगितले. ते पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सौरऊर्जेद्वारे सात हजार मेगावॉटची वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट महावितरणचे स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांचे प्रतिपादन.#MSEDCL #electricity #Power #solarenergy #agriculture pic.twitter.com/D75WfmVS6R
— Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@MSEDCL) April 29, 2023
विश्वास पाठक म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना -२.०’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांच्या हस्ते नुकताच या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. सौरऊर्जेद्वारे मिळणारी वीज अनुमाने ३ रुपये ३० पैसे प्रतियुनिट दरापर्यंत मिळणार असल्याने भविष्यात उद्योगांवरील ‘क्रॉस सबसिडी’चा बोजा अल्प होऊन उद्योग, तसेच व्यवसाय यांच्या वीजदरात घट होऊ शकेल.