गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) व्यापारपेठेमधील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करा ! – राजू यादव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) – गांधीनगर व्यापार पेठेत वळीवडे कॉर्नर ते ‘चिंचवाड ट्रान्सपोर्ट लाईन’ रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. चिंचवाड, गडमुडशिंगी, वसगडे इथून येणार्या रुग्णवाहिकेस अन्य वाहनांना त्याचा त्रास होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या कोंडीतून मार्गक्रमण करणे एक मोठे संकटच ठरत आहे. तरी गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) व्यापारपेठेमधील वाहतूक कोंडीवर त्वरित उपाययोजना करण्यात यावी, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती प्रिया पाटील यांना देण्यात आले.
‘गांधीनगर पोलिसांना याविषयी सूचना देऊन लवकरात लवकर वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवू आणि कायमस्वरूपी वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपाययोजना करू’, असे आश्वासन श्रीमती प्रिया पाटील यांनी दिले. या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, सर्वश्री पोपट दांगट, संतोष चौगुले, दीपक फ्रेमवाला, वीरेंद्र भोपळे, जितेंद्र कुबडे यांसह अन्य उपस्थित होते.