ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, तसेच विद्यार्थी यांना मुंबई मेट्रोत २५ टक्के सवलत !
मुंबई – ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, तसेच विद्यार्थी यांना आता मुंबई मेट्रोमधून सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. १ मेपासून म्हणजेच महाराष्ट्रदिनापासून त्यांना २५ टक्के सवलत मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई वन)’ वापरणार्या या श्रेणीतील सहस्रो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि अपंग प्रवासी यांना ४५ ट्रीप किंवा ६० ट्रीपसाठी मुंबई वन पासावर ही सवलत मिळणार आहे.
#MumbaiMetro | CM @mieknathshinde has announced that they will get 25% discount from 1st May, Maharashtra Day for Senior citizens, disabled & students in #Mumbai #Metro at discounted rates.#maharashtraday #maharashtranews #MumbaiMetroLine7 #MumbaiMeriJaan #Maharashtra pic.twitter.com/vMVu6hkqk5
— Mumbai Tez News (@mumbaitez) April 29, 2023
ही सुविधा ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता १२ वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी अपंग असणार्या लोकांसाठी आहे. यासाठी संबंधितांना काही कागदपत्रे सादर करावी लागतील. अपंगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन कार्ड (विद्यार्थी किंवा पालकांचे पॅन कार्ड), समवेत शाळेचे ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत. या सर्व सवलती मेट्रो लाइन २ ए आणि ७ च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्रे दिल्यावर मिळू शकतील. या सुविधा ३० दिवसांची वैधता राहील. मुंबई १ कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासाच्या काळातही वापरता येईल अन् रिचार्जही करता येईल.