सोलापूर जिल्ह्यात वादळी वार्यासह अवकाळी पावसाने शेतीपिकांची हानी !
विजेचे खांब आणि झाडे पडली, तर सखल भागांत पाणी साठले
सोलापूर – जिल्ह्यात सलग २७ आणि २८ एप्रिल या दिवशी वादळी वार्यासह झालेल्या अवेळी पावसामुळे विजेचे खांब अन् अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतीतील पिकांची मोठी हानी झाली. आंबा, केळी आणि पपई या फळबागांची मोठी हानी झाली आहे. वादळाने शहरातील अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहनांची हानी झाली, तर पावसाने सखल भागांतील झोपडपट्ट्यांतील अनेक घरांत पाणी शिरले. शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता.
( सौजन्य : in SOLAPUR NEWS )
सोलापूर महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा ढिसाळ !
कोसळलेली झाडे हटवण्यासाठी जेसीबी आणि कटर यंत्रणा विलंबाने पोचली. रस्त्याच्या बाजूचे ‘स्टार्म ड्रेनेज वॉटर सिस्टीम’चे तोंड बंद असल्याने साचलेले पाणी अनेकांच्या घरात शिरले. सलगरवस्ती, होटगी रस्ता, फॉरेस्ट, नवीपेठ, व्हीआयपी रस्ता येथे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हवामान विभागाने अवकाळी पावसाची चेतावणी दिलेली असतांनाही महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज नव्हती. लातूर येथे ग्रामीण भागांतील घरांवरील पत्रे आकाशात उडाले
लातूर शहर आणि जिल्ह्यात ३९.५ मि.मी. एवढा पाऊस पडला असून २८ एप्रिल या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने महसूल मंडळात अतीवृष्टीची नोंद झालेली आहे. जळकोट तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, गारपीट होऊन मुसळधार पाऊस पडला. वादळी वार्याने ग्रामीण भागातील घरांवरील पत्रे पतंगासारखे आकाशात उडत होते.