परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर ‘प्रत्येक पदन्यास म्हणजे नाम’, असे त्यांनी सूक्ष्मातून सुचवणे
‘एकदा मी नृत्याचा सराव करत असतांना मला एक पदन्यास (स्टेप) करायला जमत नव्हता. मी तो पुनःपुन्हा करून पहात होते; पण तो अपेक्षित असा करता न आल्याने थोड्या वेळाने मला सराव करण्याचा कंटाळा आला. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी मला (सूक्ष्मातून) सुचवले, ‘नृत्यातील प्रत्येक पदन्यास म्हणजे ‘नाम’ आहे आणि पदन्यास पुनःपुन्हा केल्याने नामजप होणार आहे.’ या विचाराने मी परत सराव चालू केला.
प्रत्येक पदन्यासाला भावाचे सूत्र जोडून नृत्याचा सराव करू लागल्यावर तो अपेक्षित अशा प्रकारे होऊन पुष्कळ आनंद अनुभवता येणे
काही काळ नामजप करत सराव करूनही मला अपेक्षित असा पदन्यास करणे जमत नव्हते. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘नृत्याच्या वेळी केला जाणारा नामजप माझ्याकडून भावपूर्ण रितीने होत नाही.’ यानंतर मी ‘प्रत्येक पदन्यासाला भावाचे सूत्र जोडून नृत्याचा सराव करू लागले. तेव्हा मला कंटाळा आला नाही. जेव्हा भाव ठेवून नृत्याचा सराव केला, तेव्हा तो अपेक्षित असा झाला आणि मला पुष्कळ आनंद अनुभवता आला. सराव करतांना ‘माझा नामजपही अखंड चालू आहे’, असे लक्षात येऊन मला गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता वाटू लागली.’ (११.९.२०२२)
– कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |