स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना प्रारंभी झालेली चुकीची विचारप्रक्रिया आणि त्यानंतर प्रक्रियेचे महत्त्व लक्षात आल्यावर देवाच्या कृपेने निर्माण झालेली सकारात्मकता !
‘शिष्याचे जीवन आनंदी असणे’, यातच गुरूंना आनंद असतो ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
‘माझ्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे माझ्याकडून साधनेत आणि सेवेत चुका होतात. २ वर्षांपूर्वी माझ्या चुका लक्षात आल्यावर सहसाधकांनी त्या वेळोवेळी सांगून मला पुष्कळ साहाय्य केले; पण ‘माझ्यात स्वभावदोष किंवा अहंकार आहे’, हे स्वीकारण्यास माझे मन सिद्ध होत नव्हते. अशा वेळी माझ्या व्यष्टी किंवा समष्टी साधनेत अडथळा ठरणारे माझे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू घालवण्यासाठी मी प्रक्रिया राबवायला लागले.
१. मनातील अयोग्य विचारांमुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेची परिणामकारकता न्यून होणे
जेव्हा मी प्रक्रिया राबवायला लागले, तेव्हा माझ्या मनाची विचारप्रक्रिया पुढीलप्रमाणे होती.
अ. ‘माझ्यात स्वभावदोष आणि अहंकार आहे’, असे सर्वांना वाटत असल्यामुळे मी प्रक्रिया राबवत आहे. ‘सर्वांना वाटत आहे; म्हणून मी प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे’, हे स्वीकारायला हवे. ‘स्वीकारणे’ हा साधनेतील महत्त्वाचा पैलू आहे. त्यामुळे स्वीकारायला हवे. प्रत्यक्षात मात्र अंतर्मनापासून न स्वीकारल्याने त्यात माझी साधना झाली नाही.
आ. माझे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू दाखवणार्या साधकांमध्ये किती स्वभावदोष आणि अहं आहेत !
इ. माझ्यात स्वभावदोष आहेत; पण त्यांची तीव्रता अधिक नाही.
एकूणच अशी मानसिकता असल्याने मी ही प्रक्रिया माझ्यावर कुणीतरी लादल्याप्रमाणे राबवत होते. माझ्या अयोग्य मानसिकतेमुळे माझ्याकडून झोकून देऊन आणि अंतर्मुखतेने जे प्रयत्न व्हायला हवे होते, ते झाले नाहीत. जे काही प्रयत्न व्हायचे, त्यात अल्पसंतुष्टता येऊन पुढील प्रयत्नांची गती न्यून झाली. त्यामुळे प्रक्रियेची परिणामकारकता न्यून झाली. कालांतराने माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू पुन्हा उफाळून यायला लागले अन् त्यातून माझ्याकडून साधनेत पुन्हा चुका व्हायला लागल्या.
२. स्वभावदोष आणि अहं असल्याचे अंतर्मनातून न स्वीकारल्याने त्यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया वरवरची होणे
माझ्यात स्वभावदोष आणि अहं असल्याचे मी अंतर्मनातून स्वीकारले नव्हते. त्यामुळे मी राबवलेली प्रक्रिया अत्यंत वरवरची होती. मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासारख्या आपले मन निर्मळ आणि पारदर्शक करणार्या, तसेच आपल्याला खर्या अर्थाने सुंदर बनवणार्या या दैवी प्रक्रियेचे महत्त्वच समजले नव्हते. मी ‘माझी प्रक्रिया झाली आहे’, या भ्रमात होते. त्यामुळे माझ्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत सातत्य राहिले नाही; परिणामी माझे स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता पुन्हा वाढली.
३. साधकांविषयीच्या पूर्वग्रहामुळे त्यांच्याशी सहज संवादही साधता न येणे आणि त्यांच्या चुकांकडे लक्ष जाणे
काही सहसाधकांविषयी माझ्या मनात पूर्वग्रह निर्माण झाला होता. त्याची तीव्रता अधिक होती. माझ्या मनात ज्या साधकांविषयी पूर्वग्रह होता, त्यांच्याशी साधा सहज संवादही मला साधता येत नव्हता. माझ्यातील तीव्र बहिर्मुखतेमुळे माझे लक्ष सातत्याने त्या साधकांच्या चुका आणि वागण्या-बोलण्याची पद्धत यांकडे जायचे. त्यांनी कोणतीही कृती केल्यावर ती सहजपणे न पहाता त्यात त्यांच्याविषयी असलेल्या माझ्या पूर्वग्रहाला पूरक होईल, असा निष्कर्ष मी काढायचे. त्यामुळे सेवा करण्याच्या ठिकाणची सात्त्विकता अल्प झाली होती.
४. उत्तरदायी साधकांच्या साहाय्याने ‘पूर्वग्रहदूषितपणा’ न्यून करण्यासाठी प्रयत्न चालू केल्यावर त्यात जाणवण्याइतके पालट होणे
‘माझ्यातील पूर्वग्रहाची तीव्रता पहाता त्यातून बाहेर पडायला हवे’, असे मला तीव्रतेने वाटत होते; पण त्यासाठी माझ्याकडून योग्य असे प्रयत्न होत नव्हते. त्यासाठी उत्तरदायी साधकांनी मला योग्य दृष्टीकोन सांगितले. त्यात ‘साधक आपले गुरुबंधू आणि गुरुभगिनी आहेत. त्यांच्यातील गुण पाहून गुरुदेवांनी त्यांना जवळ घेतले आहे. आपणही त्यांचे गुण पहायला हवेत’, या दृष्टीकोनासह त्यांनी मला कृतीच्या स्तरावरही प्रयत्न करायला सांगितले. त्यासाठी त्यांनी मला माझ्या मनात ज्या साधकांविषयी पूर्वग्रह होता, त्यांच्या गुणांची सूची बनवण्यास सांगितली. जेव्हा मी त्या सहसाधकांचे स्वभावदोष न आठवता केवळ गुण आठवण्यासाठी प्रयत्न करायला लागले, तेव्हा मला त्यांचे गुण आठवतच नव्हते. आजपर्यंत मी त्यांच्या गुणांकडे कधी पाहिलेच नव्हते. पुष्कळ प्रयत्न केल्यावर मला एखादा गुण आठवायचा; पण पुन्हा त्यांच्या चुकांची आठवण होऊन त्यांचे स्वभावदोष आठवायचे. त्यामुळे मला त्या सहसाधकांचे गुण आठवायला ३ – ४ दिवस लागले. यावरून मला माझ्यातील पूर्वग्रहाची तीव्र जाणीव झाली. भगवंताच्या कृपेने सहसाधकांचे गुण आठवत असतांना त्यांच्याविषयी असलेल्या पूर्वग्रहाची तीव्रता काही प्रमाणात न्यून होऊन मला त्यांच्याशी बोलता येऊ लागले. मला त्यांच्याशी काही प्रमाणात संवाद साधता येऊ लागला. तेव्हा माझ्या मनात साधकांविषयी असलेली नकारात्मकता न्यून होऊन सकारात्मकता वाढली. त्यामुळे माझ्या मनात सहसाधकांविषयी पूर्वग्रह राहिला नाही.
५. प्रयत्नांत सातत्य न राहिल्याने प्रसंगानंतर मनात सहसाधकांविषयी प्रतिक्रिया येण्यास आरंभ होणे
‘ज्या वेळी माझ्याकडून योग्य प्रयत्न झाले, तेव्हा त्यांचा सकारात्मक परिणाम झाला’, हा अनुभव घेतलेला असूनही मला त्या प्रयत्नांत सातत्य ठेवता आले नाही. त्यात माझ्यातील ‘अल्पसंतुष्टता’ या स्वभावदोषामुळे आणि ‘मला जमले’, या विचाराने प्रक्रियेला खीळ घातली अन् कालांतराने माझ्या मनात पुन्हा त्या साधकांविषयी प्रतिक्रिया येण्यास आरंभ झाला. २ साधकांविषयी माझ्या मनातील पूर्वग्रह समूळ गेला नव्हता. त्यामुळे काही प्रसंग घडल्यानंतर त्या साधकांविषयी माझ्या मनातील प्रतिक्रियांचे प्रमाण वाढले. अशा वेळी ‘त्यांच्या गुणांचा विचार करून त्यावर मात करायची’, ही उपाययोजना ज्ञात असूनही मी तसे प्रयत्न केले नाहीत; परिणामी पुन्हा पूर्वीसारखी स्थिती निर्माण झाली.
६. स्वतःच्या चुकांची जाणीव होणे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी मनात सकारात्मकता निर्माण होणे
यापूर्वी जेव्हा असे काही प्रसंग घडायचे, तेव्हा ‘मी चुकत नाही. साधक आणि परिस्थिती हेच अयोग्य असतात’, असे मला वाटायचे. या वेळी मात्र तसे न होता ‘मला माझ्यात पालट करायचा असल्याने मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे अत्यावश्यक आहे’, याची मला जाणीव झाली. ‘प्रसंग घडल्यानंतर त्यातील चुकांसाठी प्रक्रिया राबवणे’, ही योग्य कृती नसून आपण सातत्याने प्रक्रिया करत रहाणे महत्त्वाचे आहे’, हे मला जाणवले. त्यानुसार भगवंताच्या कृपेने मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेत सहभागी होता आले. त्यामुळे मी भगवंताच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. पूर्वी कुणी मला माझ्या चुका आणि स्वभावदोष यांची जाणीव करून दिली, तर मला ते स्वीकारता येत नसे. आता मात्र ‘मला सर्वांचे साहाय्य घ्यायचे आहे. मला प्रक्रिया तळमळीने राबवायची आहे. देवाच्या कृपेने मला पुन्हा संधी मिळाली आहे. त्यासाठी देवाला शरण जाऊन मला प्रयत्न करायचे आहेत’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. ‘एखादा आजार आहे’, हे समजल्यावर आणि स्वीकारल्यावरच आपल्याला त्यावरील उपचारांचे महत्त्व ध्यानात येते. तेव्हाच आपण त्यावर तळमळीने उपचार करतो; तसेच माझ्या संदर्भात घडल्याचे मला जाणवते.
७. आढावासेविकेने स्वभावदोष आणि अहं यांची कठोरतेने जाणीव करून दिल्यावर त्यांच्याविषयीही आपलेपणा अन् कृतज्ञता वाटून मन सकारात्मक होणे
माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता अधिक असल्याने आढावासेविका सौ. सुप्रिया सुरजित माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांना मला त्यांची कठोरपणे जाणीव करून द्यावी लागते; पण तेव्हा मला त्यांच्याविषयी प्रतिक्रिया न येता आपलेपणा वाटतो. (पूर्वी मला प्रतिक्रिया आली असती.) त्या मला माझ्या आईप्रमाणे वाटतात. मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. ‘माझ्याकडून जेवढ्या तळमळीने प्रयत्न व्हायला हवेत, तेवढे अजून होत नाहीत; परंतु मला ते १०० टक्के करायचेच आहेत. मला पालटायचे आहे. मला ‘देवाला आवडेल’ असे निर्मळ व्हायचे आहे’, असे वाटून माझा उत्साह वाढतो. जेव्हा ‘मला प्रक्रिया राबवायची आहे’, हे स्वीकारून माझे मन सकारात्मक झाले, तेव्हा
मला प्रक्रियेतील खरा आनंद मिळू लागला. ‘प्रक्रियेच्या आढाव्यात सांगितले जाणारे प्रत्येक सूत्र माझ्यासाठी आहे आणि मला ते सारे प्रयत्न करायचे आहेत’, असे मला तळमळीने वाटू लागले आहे.
‘हे भगवंता, ‘केवळ तुझ्या कृपेनेच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया समजून मला तिच्यातील आनंद घेता येऊ लागला आहे. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून अंतर्बाह्य शुद्धी होण्यासाठीच हा मनुष्य जन्म मिळाला आहे’, याची जाणीव तूच मला करून दिलीस. ही प्रक्रिया राबवण्यासाठी तूच मला सकारात्मक केलेस. तूच मला सहजतेने प्रक्रियेत सामावून घेतलेस आणि त्यासाठी माझ्याकडून प्रयत्नही करून घेत आहेस’, याबद्दल मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– अश्विनी कुलकर्णी, ढवळी, फोंडा, गोवा. (१५.९.२०२०)
‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवायची कशी ?’, हे स्वतःच्या उदाहरणावरून सर्वांना शिकवणार्या अश्विनी कुलकर्णी यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (१३.४.२०२३) |