अनेक प्रकरणे प्रलंबित असतांना एका काल्पनिक विषयावर न्यायालयाचा वेळ वाया घालवला जात आहे !
समलिंगी विवाहाच्या विरोधात जैन आचार्य शिव मुनी यांचे राष्ट्रपतींना पत्र
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयात गेल्या काही दिवसांपासून समलिंगी विवाहाला मान्यता देण्याच्या मागणीवरील याचिकांवर प्रतिदिन सुनावणी चालू आहे. समलिंगी विवाहाला हिंदु संघटना, संत आदींनी यापूर्वीच विरोध केला आहे. आता जैन मुनीही विरोध करू लागले आहेत. जैन आचार्य शिव मुनी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून याचा विरोध केला आहे. ‘न्यायालयाने अनेक प्रकरणे प्रलंबित असतांना एका काल्पनिक विषयावर न्यायालयाचा वेळ वाया घालवला जात आहे, हे अयोग्य आहे’, असे त्यांनी यात म्हटले आहे.
महान जैनाचार्य शिव मुनि जी महाराज ने #SameGenderMarriage के विरोध में भेजा @rashtrapatibhvn को पत्र … pic.twitter.com/cvnP0Ea1Cs
— Vishva Hindu Parishad -VHP (@VHPDigital) April 28, 2023
जैन आचार्य शिव मुनी यांनी या पत्रात मांडलेली सूत्रे
१. समलिंगी विवाहाला कायद्याद्वारे मान्यता देण्यात येऊ नये. भारतात आज अनेक समस्या असून त्यांच्याशी लढले जात असतांना समलिंगी विवाहासारख्या विषयावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. गरिबी निर्मूलन, सर्वांना शिक्षण, प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि लोकसंख्या नियंत्रण आदी गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालय कोणतीही तत्परता दाखवत नाही.
२. भारत सर्व धर्म, जाती आणि जमाती यांचा देश आहे. येथे अनेक शतकांपासून समलिंगी विवाहाला मान्यता देण्यात आलेली नाही. विवाह मानवाच्या उन्नतीशी संबंधित आहे.
३. समलैंगिकांच्या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीच संरक्षित केले आहे. समलिंगी विवाह हा मूलभूत अधिकार नाही, तर वैधानिक अधिकार असू शकतो. याला विशेष विवाह अधिनियमाच्या अंतर्गत मान्यता देण्यात येऊ नये. हे अधिनियम महिला आणि पुरुष यांच्यासाठी आहे.
४. विवाह ही एक सामाजिक संस्था आहे. आता तिला नष्ट केले जाऊ शकत नाही आणि त्याला नवे रूप देता येऊ शकत नाही. भारतात विवाहाला महत्त्व आहे आणि ही एक महान संस्था आहे. काळानुसार ती प्रत्येक कसोटीवर खरी उतरली आहे. स्वतंत्र भारतात यावर पाश्चात्त्य प्रथा थोपण्याचा प्रयत्न केला जात आहे.