पुंछमधील (जम्मू-काश्मीर)आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर द्यायला हवे !
भारतीय सैन्याचे एक वाहन भिंबरगलीवरून (राजौरी) पुंछच्या दिशेला येत होते. आतंकवाद्यांनी वाहनावर ‘ग्रेनेड’द्वारे आक्रमण केले. या आक्रमणात वाहनाने पेट घेतला. या आक्रमणात भारतीय सैन्याचे ५ सैनिक हुतात्मा, तर १ सैनिक गंभीररित्या घायाळ झाला आहे.
१. काश्मीर भागात आतंकवाद असल्याचे दाखवण्याचा पाकिस्तानचा केविलवाणा प्रयत्न !
भिंबरगली (राजौरी) आणि पुंछमधील हा भाग ‘साऊथ ऑफ पिर पंजाल’ म्हणजेच पुंछ, अखनौर, राजौरी, जम्मू या भागांत येतो. या भागात गेल्या वर्षभरात कोणतेही आतंकवादी आक्रमण झाले नव्हते. काश्मीरमधील आतंकवादही न्यून झाला असून तो केवळ काश्मीर खोर्यापर्यंत मर्यादित झाला आहे. या भागांतही केवळ ‘सॉफ्ट टार्गेट्स’(काश्मिरी हिंदु अथवा तेथील कामगारांवर) वर आक्रमणे होतात. या आक्रमणाद्वारे पाकिस्तानला असे चित्र सिद्ध करायचे होते की, पुंछ-राजौरी या भागातही आतंकवाद आहे. ‘जी २०’ची (विकसित आणि विकसनशील २० देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना) एक बैठक मे मासात श्रीनगर येथे होणार आहे. श्रीनगरमध्ये प्रथमच अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित होत आहे. ‘काश्मीरमधील आतंकवाद संपला नाही. काश्मीरविषयी संयुक्त राष्ट्राने चर्चा करणे आवश्यक आहे’, असे भासवण्यासाठी पाकिस्तानने केलेला हा कावेबाजपणा आहे.
२. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ (लक्ष्यित आक्रमण) करायला हवा !
अशा प्रकारची आतंकवादी आक्रमणे रोखण्यासाठी ‘अँटी इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन्स्’ (घुसखोरी रोखण्यासाठीची मोहीम) आणि ‘अँटी टेररिस्ट ऑपरेशन्स्’ (आतंकवाद्यांना रोखण्यासाठीची मोहीम) ही प्राधान्याने सैन्याकडून राबवली जातील. जे आतंकवादी भारताच्या हद्दीत आले असतील, त्यांना मारण्यात यश येईल, याविषयी कुणाच्याही मनात शंका नको. पाकला धडा शिकवणे, हे अधिक महत्त्वाचे आहे. ‘पाकने आतंकवादी आक्रमण केले, तर त्यांना याची फार मोठी किंमत मोजावी लागेल’, असा धडा देण्यासाठी पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करावा लागेल आणि ते भारतीय सैन्य, वायू अथवा नौदलही करू शकते.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.