व्यावहारिक कर्तव्ये सांभाळून साधना आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ यांचा तळमळीने प्रचार करणारे सोनगाव, खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. संतोष घोरपडे (वय ५४ वर्षे) !
‘सोनगाव, खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे साधक श्री. संतोष घोरपडे यांचे ३०.३.२०२३ या दिवशी हृदयविकाराने निधन झाले. उद्या ३०.४.२०२३ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. आस्थापन आणि सामाजिक क्षेत्रातील दायित्व सांभाळत असतांना गुरुसेवेला प्राधान्य देणे
कै. संतोष घोरपडे धर्मप्रचाराची सेवा करत होते. ते आपले व्यावहारिक कर्तव्य सांभाळून रात्रंदिवस साधना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांचा प्रचार तळमळीने करत होते. हे सर्व करत असतांना त्यांनी भोजन, विश्रांती, आरोग्य आणि कुटुंब यांचा कधीच विचार केला नाही. आस्थापन आणि सामाजिक क्षेत्रातील दायित्व सांभाळत असतांना ते गुरुसेवेला प्राधान्य देत असत. त्यांना कधीही संपर्क साधला किंवा त्यांची भेट झाल्यास ते नेहमीच सेवा, नियोजन आणि प्रसार यांविषयीच बोलत असत.
२. धर्मप्रसाराची सेवा आणि समाजसाहाय्य यांद्वारे व्यापक लोकसंग्रह जोडणे
कै. घोरपडे यांनी अतिशय दुर्गम भागात सनातन संस्थेचे धर्मप्रसारचे कार्य पोचवले. अनेक दुर्गम ग्रामीण भागात त्यांच्या प्रयत्नांमुळे सनातनची नियतकालिकांचे वाचक हिंदु राष्ट्र स्थापनेच्या चळवळीशी जोडले गेले आहेत. ते समाजात जाऊन घराघरातील कुटुंबाचे एक सदस्य बनले आणि त्यांनी समाजातील लोकांशी जवळीक केली. त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे सर्व उपक्रम या दुर्गम भागांमध्ये तळमळीने पोचवले, हे सर्व साधकांना प्रेरणादायी होते. ‘त्यांच्या आकस्मिक निधनामुळे धर्मप्रसाराच्या कार्याची मोठी हानी झाली’, अशी हळहळ अनेकांनी व्यक्त केली. ते समाजातील सर्वच स्तरांवरील संघटनांना जोडणारे आणि व्यापक लोकसंग्रह असणारे धर्मसेवक होते.
३. ‘अखेर अंतिम प्रवास हा एकट्याचाच असतो’, या गुरुदेवांच्या ब्रह्मवाक्याची प्रचीती देणारी कै. घोरपडे यांची अखेरची भेट
घोरपडे यांना मध्यरात्री श्वास घेण्यास तीव्र त्रास होत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी त्यांना आवश्यक ते उपचार करण्यासाठी अतीदक्षता विभागात ठेवले. मी त्यांना उपचार चालू असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची स्थिती जाणून घेतली. २ घंट्यांनी मी पुन्हा एका साधकासह त्यांना पहाण्यासाठी गेलो. तेव्हा त्याही स्थितीत त्यांनी आमच्याकडे पाहिले आणि आम्हाला खुणेने ‘काळजी करू नका’, असे त्यांनी सांगितले; मात्र तेव्हा त्यांना श्वास घेण्यास पुष्कळच त्रास होत होता. काही मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आधुनिक वैद्य त्यांच्यावर उपचारांची पराकाष्ठा करत होते. आम्ही प्रत्येक क्षण निःशब्दपणे आणि आंतरिक वेदनेने पहात होतो. त्यांची जीवन-मृत्यूशी चाललेली झुंज हताशपणे पहाणे आणि गुरुदेवांना आळवणे यांविना आम्ही काहीच करू शकत नव्हतो अन् शेवटी त्यांची धडपड थांबली. ते सर्व पहातांना केव्हा तरी मागे गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) मुखातून ऐकलेल्या ब्रह्मवाक्याची आठवण झाली, ‘अखेर अंतिम प्रवास हा एकट्याचाच असतो.’ या प्रसंगातून गुरुदेवांनी आम्हाला जीवनाचे अंतिम सत्य दाखवले.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’- डॉ. हेमंत चाळके, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (७.४.२०२३)