मराठी भाषेचे भूषण विष्णुशास्त्री चिपळूणकर !
आज विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची तिथीनुसार (वैशाख शुक्ल नवमी) जयंती आहे. त्या निमित्ताने….
‘शके १७७२ च्या वैशाख शुक्ल नवमी (२० मे १८५०) या दिवशी अर्वाचीन मराठी वाङ्मयातील निबंधप्रवर्तक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म झाला.
देशाभिमान, निःस्पृहता, विद्वत्ता आणि ग्रंथकर्तृत्व हे शास्त्रीबुवांचे गुण सर्वमान्य आहेत. न्यू इंग्लिश स्कूल, केसरी, मराठा, चित्रशाळा आणि किताबखाना संस्था यांवरून त्यांचा कर्ता देशाभिमान व्यक्त होतो. स्वधर्म, स्वदेश, स्वतःचा इतिहास, स्वभाषा वाङ्मय यांच्याविषयी आपल्याच सुधारकांमध्ये मनस्वी तिटकारा वसत असलेला पाहून शास्त्रीबुवांना वाईट वाटे. त्यांनी समाजातील दोष कधीच लपवले नाहीत. ‘संपत्तीचा उपयोग’, ‘लोकभ्रम’ या निबंधांतून त्यांनी समाजाचे दोषनिवारण केले आहे. आपल्या लोकांना विशेषतः पंडितांना स्वाभिमानशून्यतेने घेरले आहे, ही गोष्ट चिपळूणकरांनी ओळखली. ‘स्वाभिमानशून्यता ही राष्ट्रविध्वंसक राक्षसी वृत्ती आहे’, असे त्यांचे ठाम मत होते. हा स्वाभिमान निर्माण करण्यासाठीच त्यांचे सद़्गुण आणि त्यांच्या सत्कृती उपयोगी पडल्या आहेत. त्यांची ‘निबंधमाला’ (मासिक) सहाच वर्षे चालली; परंतु तिने सार्या महाराष्ट्रास मोहिनी घातली. ह.ना. आपटे, शि.म. परांजपे, वि.का. राजवाडे, श्री.कृ. कोल्हटकर, ल.रा. पांगारकर, न.चिं. केळकर यांना देश आणि वाङ्मय यांच्या सेवेची स्फूर्ती निबंधमालेपासून झाली आहे. अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात एवढे श्रेय चिपळूणकरांना मिळाले होते.
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))