कल्याण येथे ‘ग्रामीण कला मंच’ आणि दैनिक ‘अग्रलेख’ यांचा वर्धापनदिन उत्साहात साजरा !
ठाणे, २८ एप्रिल (वार्ता.) – ‘ग्रामीण कला मंच’ आणि दैनिक ‘अग्रलेख’ यांचा वर्धापनदिन कल्याण येथील अत्रे रंगमंदिर येथे नुकताच पार पडला. या वेळी ‘रेड लाईट’ या २ अंकी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बांदल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी दैनिक ‘अग्रलेख’च्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त त्यांच्या सर्व प्रतिनिधींचा तसेच ग्रामीण कला मंचच्या सर्व कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वेश्या वस्तीतील महिलांचे रहाणीमान, त्यांच्या मुलांना समाजाकडून सोसावी लागणारी अवहेलना, सामाजिक विषमता, राजकीय गुंडांकडून होणारा त्रास असे अनेक विषय या नाटकातून उत्तम प्रकारे मांडण्यात आले. उमेश मारुति भेरे यांनी या नाटकाच्या लेखनासह निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य, पार्श्वसंगीताचे दायित्व उत्तमरित्या सांभाळले. या नाटकात डॉ. सोनाली म्हाळसाने बर्हे, प्रणाली गणवीर-पाटील आणि प्रसाद वैद्य यांनी प्रमुख भूमिका साकारून नाटकाला अभिनयाची चांगली उंची दिली, तर नितीन गाडेकर, अहिल्या मोरे, सुशील शिरसाठ, सुरेश भेरे, महेश खाडे, माधुरी सविता, कविता कोर, दिव्या शिर्के, अविनाश दलाल, भरत फर्डे, धनेश पाटोळे, अश्विनी मोरे, संतोष जाधव आणि गणेश किरपण यांनी उत्तम सादरीकरण केले. या नाटकाची प्रकाशयोजना उमेश दुधाणे, विशाल पितळे यांनी केली, तर वेशभूषा मैथिली उमेश भेरे आणि रंगभूषा सोहम् कोचरेकर यांनी केली.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी दैनिक ‘अग्रलेख’च्या ८ जिल्ह्यांतील भरारीचे कौतुक केले, तर ‘ग्रामीण कला मंच’च्या चढत्या आलेखाचा मागोवा घेतला. या कार्यक्रमाप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव काशिनाथ तिवरे, अभिनेते दीपक खांडेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेशकुमार धानके, शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विनायक सापळे, भारतीय मानव विकास सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश घेगडे, शिक्षणतज्ञ पद्मिनी कृष्णा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत चौधरी यांनी केले.