धर्मादाय रुग्णालयांतील गरिबांसाठीच्या राखीव खाटांची माहिती ‘अॅप’द्वारे मिळणार !
मुंबई – धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या जागांपैकी किती खाटा शिल्लक आहेत ? याची माहिती भविष्यात भ्रमणभाषवर ‘अॅप’द्वारे उपलब्ध होणार आहे. यासाठीचा ‘अॅप’ प्राधान्यक्रमाने सिद्ध करण्याचा आदेश आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी प्रशासनाला दिला आहे.
हे ‘अॅप’ सर्वसामान्य नागरिकांना सहजतेने हाताळता येण्यासारखे असावे, असे या वेळी डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. २७ एप्रिल या दिवशी त्यांनी मंत्रालयामध्ये धर्मादाय रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या वेळी धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धर्मादाय रुग्णालयांमध्ये १० टक्के जागा निर्धन रुग्णांवरील विनामूल्य उपचारासाठी, तर १० टक्के जागा गरीब रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचारासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे; मात्र अनेक धर्मादाय रुग्णालयांविषयी लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या आहेत.
सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी आदर्श कार्यप्रणाली सिद्ध करावी ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री
धर्मादाय रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची शिधापत्रिका आणि उत्पन्नाचा दाखला यांव्यतिरिक्त अन्य कागदपत्रांसाठी अडवणूक होऊ नये. धर्मादाय अंतर्गत येणार्या रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा आणि सवलतीच्या दरात उपचार मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी आदर्श कार्यप्रणाली सिद्ध करावी.