रशियाने युक्रेनी शहरांवर केलेल्या हवाई आक्रमणांत १३ लोक ठार !
रशियावरील आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा स्तर वाढवला पाहिजे ! – युक्रेन
कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनच्या विविध शहरांवर केलेल्या हवाई आक्रमणांमध्ये १३ लोक ठार झाले आहेत. यांपैकी ११ लोक हे उमान या शहरातील एका इमारतीवर झालेल्या आक्रमणात ठार झाले. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. निप्रो या शहरात झालेल्या आक्रमणात एक महिला आणि तिची ३ वर्षीय मुलगी ठार झाली. राजधानी कीवसह मध्य युक्रेनमधील क्रेमेनचुक येथेही आक्रमणे करण्यात आली.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी आक्रमणांचा निषेध करत म्हटले की, रशियाने केलेल्या या आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावरील आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा स्तर वाढवला पाहिजे, हे लक्षात येते. कीववर ५१ दिवसांनी आक्रमण करण्यात आले आहे. याआधी युक्रेनी सैन्याला पाश्चिमात्य मित्रराष्ट्रांकडून नवे युद्ध साहित्य मिळाल्यानंतर ‘आम्ही रशियावर आक्रमण करणार’, असा सुतोवाच त्यांनी केला होता. त्यानंतर रशियाने ही आक्रमणे केली.