भूसंपादनासाठी मोबदला न देता ११ घरे पाडली !

  • मुंबई-वडोदरा महामार्गाचे प्रकरण

  • लोकप्रतिनिधी आक्रमक !

मुंबई – मुंबई-वडोदरा महामार्गाच्‍या भूसंपादनासाठी पालघर जिल्‍ह्यातील धानिवरी येथील ११ घरे भूमीचा मोबदला न देता प्रशासनाने पाडल्‍याचा धक्‍कादायक प्रकार पुढे आला आहे. पोलीस बळाचा वापर करून या घरांवर बुलडोझर फिरवण्‍यात आला. याविषयीचे व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवरून प्रसारित झाल्‍यानंतर स्‍थानिक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी भेट देऊन संबंधित कुटुंबियांना भूमीचे पैसे त्‍वरित देण्‍याची मागणी करत आक्रमण भूमिका घेतली आहे.

सौजन्य मॅक्स महाराष्ट्र 

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा, शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील, ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे, माकपचे आमदार विनोद निकोले यांसह अन्‍य स्‍थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्‍थळी भेट दिली. लोकप्रतिनिधींनी येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या बाहेर या कारवायाच्‍या निषेधार्थ निदर्शने केली. जे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांनी ही कारवाई केली त्‍यांवर गुन्‍हा नोंदवावा, तसेच त्‍यांना निलंबित करावे, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

राज्‍य महिला आयोगाने मागितला अहवाल !

कुटुंबियांतील महिलांना बाहेर काढतांना महिला पोलिसांनी त्‍यांचे कपडे ओढले, असा आरोप करण्‍यात येत आहे. महिलांना बळजोरीने घराबाहेर काढण्‍यात आले. या प्रकरणी राज्‍य महिला आयोगाने पालघर जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महाराष्‍ट्र शासनाने मुख्‍य सचिव यांना या प्रकरणी अहवाल सादर करण्‍याचे निर्देश दिले आहेत.