बारसू येथील भूमीपुत्रांना विश्‍वासात घेऊन प्रकल्‍प पुढे नेणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

नागपूर – जिल्‍ह्यातील बारसू येथील भूमीपुत्रांना विश्‍वासात घेऊनच प्रकल्‍प पुढे नेऊ. येथील लोकांवर दबावतंत्राचा वापर करणार नाही, असे आश्‍वासन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिले.

या वेळी शिंदे यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नॅशनल कॅन्‍सर इन्‍स्‍टिट्यूटच्‍या कामाविषयी कौतुक केले. येथील नॅशनल कॅन्‍सर इन्‍स्‍टिट्यूटचे उद़्‍घाटन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्‍ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगपती गौतम अदानी, विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी खासदार अजय संचेती यांच्‍या उपस्‍थितीत झाले.

या वेळी प्रसारमाध्‍यमांशी बोलतांना एकनाथ शिंदे म्‍हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेल्‍या नागपूर-मुंबई समृद्धी एक्‍सप्रेस प्रकल्‍पाला प्रारंभी लोकांचा विरोध होता; मात्र त्‍यांनी पुन्‍हा पाठिंबा दिला. त्‍याचा निकाल आपण पहात आहोत. बारसू येथील भूमीपुत्रांना विचारात घेऊनच हा प्रकल्‍प पुढे नेला जाईल. यापूर्वी लोकांनी मान्‍यता दिली आहे. आता तिथे मातीचे परीक्षण करत आहोत. त्‍यानंतर पुढची प्रक्रिया होईल. लगेच तिथे प्रकल्‍प उभा रहाणार नाही.