साधना करण्याचा दृढ निश्चय करणार्‍या फोंडा, गोवा येथील कु. भाग्यश्री रवींद्र धांडे !

कु. भाग्यश्री धांडे

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या फोंडा, गोवा येथील कु. भाग्यश्री धांडे यांची त्यांच्या आई-वडिलांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सौ. राजश्री धांडे (कु. भाग्यश्रीची आई)

१ अ. व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा

सौ. राजश्री धांडे

१. ‘कु. भाग्यश्री कपडे आणि चादरी यांच्या घड्या व्यवस्थित घालते. ती कपाटात कपडे व्यवस्थित ठेवते. ती बाहेर जाण्याचे कपडे इस्त्री करूनच घालते.

२. आम्ही पुणे येथून स्थलांतर करतांना भाग्यश्रीने घरातील वस्तूंची सूची बनवली. तिने प्रत्येक खोक्यावर त्यातील तपशीलाची चिठ्ठी लावली. हे तिने स्वत:हून केले. त्यामुळे आम्हाला नवीन घरात आल्यावर वस्तू शोधायला अडचण आली नाही.

१ आ. घरकामात पुढाकार घेऊन साहाय्य करणे : गेली ३ – ४ वर्षे भाग्यश्री आम्ही घरी नसतांना ‘घरातील आवरणे, स्वयंपाक करणे’, अशी कामे करते. ती स्वतःहून एखादा नवीन पदार्थ बनवते. ती पुढाकार घेऊन सर्वांच्या साहाय्याने घरातील प्रलंबित कामे पूर्ण करते. घरात नवीन वस्तू घेण्याआधी ‘अभ्यास करून वस्तूची निवड कशी करायची ?’, याविषयी ती आम्हाला सुचवते.

१ इ. मायेची आसक्ती नसणे : मार्च २०२१ मध्ये भाग्यश्रीला ‘ऑनलाईन’ युवा साधकांच्या शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. तेव्हा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर भाग्यश्रीने साधना करण्याचा निर्धार केला. जून २०२१ मध्ये तिचे ‘एम्.कॉम्.’पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला महाविद्यालयात नोकरीसाठी बोलावणे आले. तेथील प्राध्यापकांनी तिला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘नोकरी चांगली आहे. तू ‘रुजू (जॉईन) हो’’; परंतु तिने त्यांना नकार दिला.

१ ई. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

१. ती सकाळी लवकर उठून नामजप करते आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय नियमितपणे करते.

२. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्यासाठी आश्रमात रहावे लागेल’, असे समजल्यावर ती त्यासाठी लगेच सिद्ध झाली.

१ उ. स्वीकारण्याची वृत्ती

१. तिच्याकडे दायित्व असलेल्या सेवेव्यतिरिक्त नवीन सेवा आल्यास ती आनंदाने सेवा स्वीकारते.

२. ती सेवेतील कार्यपद्धतींचे पालन करते.

१ ऊ. श्री गुरूंप्रती असलेला भाव : महाविद्यालयाची ‘ऑनलाईन’ परीक्षा देतांना किंवा सेवा करतांनाही ती नेहमी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ जवळ ठेवते.’

२. श्री. रवींद्र धांडे (कु. भाग्यश्रीचे वडील) (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५९ वर्षे)

२ अ. विचारून घेण्याची वृत्ती

श्री. रवींद्र धांडे

१. ‘पूर्वी  भाग्यश्री ‘अपलोडिंग’च्या समन्वयाची सेवा करत होती. ती सेवेतील साधकांचा समन्वय करतांना ‘त्यांच्या प्रकृतीचा अभ्यास करून कसे बोलायचे ?’, हे आईला विचारून घेत असे. सध्या ती हिंदी वार्तांच्या भाषांतराची सेवा करत आहे.

२. ‘सत्संगात सूत्रे आणि अडचणी कशा मांडायच्या ?’, याविषयी ती विचारून घेऊन प्रयत्न करते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १०.१२.२०२१)