चांदूर रेल्वे येथील मुंदडा महाविद्यालयावर प्रशासक नेमणार !
अमरावती – अशोक शिक्षण संस्थेद्वारा संचालित चांदूर रेल्वे येथील मदनगोपाल मुंदडा कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याच्या निर्णयावर विद्यापिठाने शिक्कामोर्तब केले आहे. २६ एप्रिल या दिवशी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या विषयीचा अहवाल आता राज्यशासनाकडे पाठवला जाणार असून त्या संदर्भातील अंतिम निर्णय शासन घेणार आहे.
या महाविद्यालयात बरेच वाद आहेत. अशोक शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ आणि महाविद्यालय प्रशासन, तसेच प्राध्यापक-प्राचार्य असेही वाद तेथे चालू आहेत. ही सर्व परिस्थिती वारंवार पुढे आल्याने या महाविद्यालयाच्या कामकाजाविषयी शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने विद्यापिठाने चौकशी करून अहवाल सादर करावा, असे राज्यशासनाचे म्हणणे होते. त्यानुसार विद्यापिठाने चौकशी समिती नेमली होती. या समितीने प्रत्यक्ष भेटी देत, तसेच संबंधितांशी संपर्क करून आपला चौकशी अहवाल फार पूर्वीच सादर केला होता. या अहवालात त्या महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याची शिफारस करण्यात आली होती.