अल्पवयीय मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीला ३ वर्षे कारावासाची शिक्षा
रत्नागिरी – कळंबुशी (संगमेश्वर) येथील राकेश रमेश चव्हाण (वय ३६ वर्षे) याने अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवून नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे पॉक्सो न्यायालयाकडून त्याला ३ वर्षे कारावास आणि ६ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
२० सप्टेंबर २०२१ या दिवशी दुपारी १.३० च्या सुमारास हा गुन्हा संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माखजन ते आरवली मार्गावर घडला. आरोपी राकेश रमेश चव्हाण याने पीडिता ही दुकानात बटाटे आणण्यासाठी जात असतांना मोटरसायकलवरून जात असतांना तिला ‘हॉर्न’ दिला. पीडिता दुकान बंद असल्याने घरी परत जात असतांना आरोपीने तिच्या पाठोपाठ जाऊन ती ‘वाचवा वाचवा’ ओरडल्यानंतर तिला रस्त्याच्या बाजूला ढकलून तिचे तोंड दाबून ‘ओरडलीस तर ठार मारीन’, अशी धमकी देऊन तिच्या मनात लज्जा उत्पन्न करून पीडितेला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरोपी राकेश याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३६३, ३५४(३)(१), ५११, ५०६ आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम १२, १८, प्रमाणे दोषारोप ठेवण्यात आला. तपासिक अंमलदार म्हणून पी.व्ही. देशमुख, साहाय्यक पोलीस निरीक्षक संगमेश्वर यांनी काम पाहिले.
या कामी सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अधिवक्त्या (सौ.) मेघना सुहास नलावडे यांनी एकूण १६ साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूचा पुरावा आणि युक्तीवाद ऐकून पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपीला भारतीय दंड संहिता कलम ३६३/५११ नुसार ३ वर्षे सश्रम कारावास आणि २००० रुपये दंड ३५४ (ड)(आय) नुसार २ वर्षे सश्रम कारावास आणि २००० रुपये दंड, ५०६ नुसार ५०० रुपये दंड आणि पॉक्सो कलम ११/१२ नुसार १ वर्षे साधी कैद आणि ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. (एकूण ३ वर्षे कारावास आणि ६००० रुपये दंड) सदर कामी पैरवी म्हणून अपूर्वा बापट यांनी काम पाहिले.