‘पहिले पाऊल – शाळापूर्व तयारी’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन
मुंबई – राज्य शासनाकडून आदर्श माता घरोघरी घडवण्याचे काम ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी’ अभियानांतर्गत चालू आहे. या अभियानात सहभागी होऊन महाराष्ट्राचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने पुढची पिढी आपणच सक्षम बनवूया, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. गेल्या वर्षी आरंभ झालेल्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे मुलांच्यात ४० टक्के प्रगती आढळून आली. यंदाच्या वर्षी अडीच लाख माता पालक गट आणि १४ लाखांहून अधिक मुलांचा सहभाग या अभियानात नोंदवला जात आहे.
नवीन शैक्षणिक धोरणात नर्सरी, ज्युनियर के.जी.(शिशूवर्ग), सिनियर के.जी. (बालवर्ग) यांचा समावेश केला आहे. यामध्ये मुलांची काळजी घेण्यासमवेतच मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, अक्षर, अंक याची ओळख, व्यक्तिमत्व विकास याची माहिती व्हावी, असा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे शाळेत प्रवेश करतांनाच मुले सक्षमपणे अभ्यास करू शकतील. मातांनी त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी या अभियानात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.