काँग्रेसच्या सामाजिक माध्यमांवरील खात्यावर बंदी घालण्यासाठी भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

या खात्यांवरून दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात येत असल्याचा भाजपचा आरोप

भाजपच्या खासदार शोभा करंद्लाजे

बेंगळुरू (कर्नाटक) – काँग्रेसच्या सामाजिक माध्यमांवरील खात्यांवर बंदी घालावी, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेश समितीचे प्रमुख डी.के. शिवकुमार यांच्या विरोधात तक्रारही केली आहे.

१. भाजपच्या खासदार शोभा करंद्लाजे यांनी म्हटले की, वर्ष २०२२ मध्ये तेलंगाणातील नलकोंडा येथे एक घटना घडली होती. त्या घटनेचा व्हिडिओ प्रसारित करून ‘ही घटना कर्नाटकातील आहे’, असे काँग्रेसकडून दाखवण्यात येत आहे. यातून काँग्रेसच्या सामाजिक माध्यमांवरील खात्यांनी विश्‍वासार्हता गमावली असल्याने त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे.

२. करंद्लाजे पुढे म्हणाल्या की, हुब्बळ्ळी येथे डी.के. शिवकुमार यांनी पत्रकार परिषदेत घेतली होती. त्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही पत्रकार परिषद होती. त्या वेळी शिवकुमार यांच्या पत्रकार परिषदेतून पत्रकार निघून गेले होते. ‘या पत्रकारांची तक्रार करतो’, अशी धमकी त्यांनी दिली होती. या प्रकरणीही शिवकुमार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.