अमरावतीत परवान्‍याचे नूतनीकरण पूर्ण न केल्‍याने १३१ सावकारांना नोटीस !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

अमरावती – या जिल्‍ह्यात नोंदणीकृत ५८९ सावकारांपैकी १३१ सावकारांनी परवान्‍याचे नूतनीकरण केले नसल्‍याने त्‍यांचा परवाना रहित करण्‍यात येईल, अशी नोटीस जिल्‍हा उपनिबंधक कार्यालयाने २५ एप्रिल या दिवशी बजावली आहे. अचलपूर तालुक्‍यातील ६१ सावकार अन्‍वेषण शुल्‍कावरून वर्ष २०२० मध्‍ये न्‍यायालयात गेले आहेत. त्‍यांचे प्रकरण मागील ३ वर्षांपासून न्‍यायप्रविष्‍ट आहे. अद्याप या प्रकरणी न्‍यायालयाचा निर्णय यायचा आहे.

खरेदी-विक्रीसाठी सावकारांना उपनिबंधक कार्यालयाचा परवाना आवश्‍यक असतो. शासनाद्वारे सावकारांनी किती व्‍याज घ्‍यावे, याचीही टक्‍केवारी निश्‍चित करण्‍यात आली आहे; परंतु त्‍याकडे दुर्लक्ष करून अनेकजण अवैधपणे सावकारी करत आहेत. जे मोठ्या प्रमाणात व्‍याजाची आकारणी करतात, त्‍यांच्‍याविषयी तक्रार आल्‍यास कारवाई केली जाते.

जिल्‍ह्यात ५८९ सावकार वैध आहेत. त्‍यांच्‍याकडे कर्ज देण्‍याचे परवाने आहेत. या सावकारांना प्रतिवर्षी ५०० रुपये भरून परवान्‍याचे नूतनीकरण करून घ्‍यावे लागते; मात्र अद्याप १३१ सावकारांनी नूतनीकरण शुल्‍कच भरले नसल्‍यामुळे उपनिबंधक कार्यालयाद्वारे नोटीस पाठवण्‍यात आली आहे.