सिरम आस्थापनाने बंद केलेला वेशीचा रस्ता ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पावित्र्यामुळे चालू !
हडपसर (जिल्हा पुणे) – साडेसतरा नळी मांजरी बुद्रुक हद्दीवरील ‘डीपी’ आणि वेशीचा रस्ता येथील सिरम व्यवस्थापनाने पत्रे आडवे लावून बंद केला होता. नागरिकांनी हा रस्ता आस्थापनाने चालू करावा, अशी मागणी करत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आमदार चेतन तुपे यांच्या मध्यस्थीनंतर तूर्त रस्त्यावरील अडथळा हटवण्यात आला असून या ठिकाणाहून वाहतूक चालू करण्यात आली आहे.
आमदार तुपे म्हणाले की, हा रस्ता दोन्ही गावांच्या वेशीवरील नकाशावर असलेला रस्ता आहे. तेथे यापूर्वी आणि आताही निधी टाकून काम करण्यात आले आहे. पथदिवेही बसवण्यात आले आहेत. हा रस्ता सध्या वाहतुकीत आहे. पुनावाला यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सध्या हा रस्ता चालू करण्यात आला आहे. उद्या पुन्हा बैठक होणार असून त्यावर निश्चित पर्याय निघेल.