नाशिक येथे ‘डीजे’सह अनावश्यक व्यय करणार्या निकाहवर मुसलमान धर्मगुरूंचा बहिष्कार !
नाशिक – इस्लाम पंथात निकाहच्या वेळी हल्ली डीजे वाजवून काही ठिकाणी निकाह (विवाह) केला जातो. अशा गोष्टींपासून समाजास परावृत्त करण्यासाठी नायब शहर-ए-काझी सय्यद एजाजुद्दीन काझी यांनी डीजे लावणार्यासह निकाहवर अनावश्यक व्यय जेथे आहे तेथे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच अल्प व्ययात साध्या पद्धतीने निकाह करण्याची विशेष मोहीम चालू केली आहे. याविषयी शहरात जनजागृतीही केली जात आहे.
परिस्थिती नसल्याने मुसलमान समाजातील अनेक मुलींचे वय वाढूनही त्यांचा निकाह होत नाही. हे टाळण्यासाठी यांनी म्हटले आहे की, साध्या पद्धतीने निकाह करावा. भेटवस्तू, आहेर, हुंडा या प्रथांना आळा घालावा. वाचलेल्या पैशांतून मुलीचे भविष्य कसे घडवता येईल, हे पहावे. तिच्या नावावर ठेवी ठेवणे, शिक्षण, रोजगारासाठी त्या रकमेचा वापर करून मुलगी स्वावलंबी होण्यास साहाय्य करता येईल. खाद्यपदार्थांवर अधिक व्यय करू नये. डीजेवर बंदीसह वाजंत्री, सजावट भेटवस्तू देणे-घेणे, आहेर असा अवाजवी व्यय टाळावा. मुलीचा हक्क आणि सुरक्षा यांसाठी मेहरची अधिक रक्कम असावी.