अक्कलकोट देवस्थानच्या नावे भामट्यांकडून भाविकांची लूट !
भक्तनिवासाचे आरक्षण करण्याच्या नावाखाली अनेक भाविकांना फसवल्याचा प्रकार उघड, दोघांना अटक !
मुंबई – सोलापूर येथील जागृत आणि प्रसिद्ध असलेल्या अक्कलकोट देवस्थानचे बनावट संकेतस्थळ सिद्ध करून भक्तनिवासाचे आरक्षण करून देण्याच्या नावाखाली काही भामटे भाविकांची लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अशा प्रकारच्या १४ तक्रारी आल्या असल्याची माहिती ‘अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज’ ट्रस्टकडून पोलिसांना देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकाराची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता आहे, तसेच राज्यातील अन्य देवस्थानच्या नावेही अशा प्रकारे बनावट संकेतस्थळ सिद्ध करून भाविकांची फसवणूक होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.
काळजी घ्या आणि कृपया ओटीपी कोणालाही देण्याची चूक करू नका.
सावधान! अक्कलकोट भक्तनिवासासाठी बुकिंग करताय, १४ जणांसोबत काय घडलं पाहा https://t.co/SkDpIHwSUJ via @mataonline
— Sarika Khot (VU2JTC) (@khotsarika) April 26, 2023
कोणत्याही प्रकारे ‘ऑनलाईन’ नोंदणी केली जात नाही ! – अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट
याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने ‘अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज’ ट्रस्टच्या विश्वस्तांशी संपर्क साधला असता त्यांनी ‘देवस्थान कोणत्याही प्रकारचे ‘ऑनलाईन बुकींग’ स्वीकारत नाही. आमच्याकडे आधारकार्ड अथवा सक्षम पुरावा पाहूनच पुढील प्रक्रिया केली जाते’, असे सांगितले. |
शाहरूख शरीफ खान आणि सौरभ गुर्जर अशी या भामट्यांची नावे असून दोघेही मध्यप्रदेशमधील भिंड जिल्ह्यातील आहेत. यातील अन्य एक आरोपीने पलायन केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. माटुंगा येथील एका महिलेला तिच्या वृद्ध आई-वडिलांना अक्कलकोट येथे न्यायचे होते. यासाठी त्यांना तेथील भक्तनिवासमध्ये रहाण्यासाठी खोलीची नोंदणी करावयाची होती. यासाठी ‘गूगल’वर शोध घेतांना अक्कलकोट संस्थानच्या नावे एक संकेतस्थळ त्यांना दिसले. त्यावरील भ्रमणभाष क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला असता सुशीलकुमार नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्या व्यक्तीने महिलेला भक्तनिवासाची छायाचित्रेही भ्रमणभाषवर पाठवली. त्यानंतर खोलीची नोंदणी करण्यासाठी ‘गूगल पेमेंट’वरून २ सहस्र २०० रुपये पाठवण्यास सांगितले. वारंवार प्रयत्न करूनही पैसे जात नसल्यामुळे सुशीलकुमार यांनी त्या महिलेकडून ‘ओटीपी’ क्रमांक मागून त्यांच्या खात्यामधील ३ लाख ९ सहस्र रुपये स्वत:च्या खात्यामध्ये वळवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या महिलेने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकादेवस्थानांच्या नावे लूट केल्याने अनेक पटींनी पाप लागते, हे समजण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक ! |