‘पर्यावरण असमतोल’ कुणामुळे ?
उष्माघाताने ‘हृदयविकारा’चा झटका येऊन जागीच मृत्यू झाल्याच्या गंभीर घटना गेल्या काही दिवसांत घडत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आतापर्यंत उष्माघातामुळे पाण्याचे शरिरातील प्रमाण अल्प होऊन अस्वस्थ वाटणे, आजारी पडणे इत्यादी व्हायचे; पण जागीच मृत्यू झाल्याच्या घटना या वर्षात अधिक प्रमाणात वाचायला मिळाल्या. याच्या अनेक कारणांपैकी प्रमुख कारण म्हणजे पर्यावरणाचा असमतोल !
कधी कडक ऊन, तर मध्येच अचानक वातावरण पालटून आभाळ येणे आणि पाऊस पडणे, अशा अचानक झालेल्या नैसर्गिक पालटामुळे त्याचा परिणाम शरिरावर होतो अन् परिणामी आजार बळावतात. तापमान वाढ ही समस्या कुठल्या एका राष्ट्रासाठी सीमित नसून ही जागतिक समस्या आहे. प्रचंड वाढलेले औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या, ‘पंचतत्त्वांचे’ वाढते प्रदूषण ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. मानवाने स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा एक प्रकारे ‘छळ’ चालू ठेवला आहे. ‘पृथ्वीला’ मानवनिर्मित विज्ञानाने १००-२०० वर्षांत नष्ट होण्याच्या मार्गावर आणून ठेवले आहे. आधी आपण ‘पंखा’ वापरायचो, आता प्रत्येक घरात ‘एसी’ (वातानुकूलित यंत्र) आहे. एवढेच नव्हे, तर त्याचा चारचाकी, उद्वाहन (लिफ्ट), प्रत्येक सरकारी आणि खासगी कार्यालये अशा सर्वत्र वापर होत आहे. ‘एसी’तील फ्लुरोकार्बनमुळे ‘ओझोन’चा स्तर घटत आहे आणि सूर्याची अतीनील किरणे अपायकारक ठरत आहे. अशा ‘एसी’ची खरोखर किती आवश्यकता आहे ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. शरिराला थोडे ऊन, वारा, पाऊस झेलण्याची सवय हवी. विदेशाप्रमाणेच आपणही तसा आहार-विहार करणे योग्य आहे का ?
स्वतःचे स्टेट्स (दर्जा) सांभाळण्यासाठी आणि पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे शरिराला आवश्यक ते देण्याऐवजी कृत्रिम गोष्टी देऊन आपण एक प्रकारे शरिर अन् पर्यावरण यांची हानी करत आहोत. त्यामुळे ‘पाश्चात्त्य’ विकृतीसमवेत नव्हे, तर ‘पर्यावरण’पूरक जगणे आवश्यक ! तापमान वाढीला ‘आधुनिक जीवनशैली’ कारणीभूत आहे आणि ती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने यात लक्ष घालून समाजाचे प्रबोधन करणेही तितकेच आवश्यक आहे. अन्यथा मानवाची विनाशाकडे वाटचाल होईल हे नक्की !
– श्री. जयेश बोरसे, पुणे