जर्मन नियतकालिकामध्ये भारताच्या लोकसंख्येची खिल्ली उडवणारे व्यंगचित्र प्रकाशित : भारताकडून संताप व्यक्त

केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर

नवी देहली – भारत नुकताच जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. याची खिल्ली उडवत जर्मनीच्या ‘डेर स्पीगल’ या नियतकालिकाने एक व्यंगचित्र प्रकाशित केले आहे. भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकल्याचे व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे. व्यंगचित्रात दोन रेल्वेगाड्या दाखवल्या आहेत. एका बाजूला जीर्ण जुनी भारतीय रेल्वेगाडी माणसांनी खचाखच भरलेली दाखवली आहे, तर दुसर्‍या बाजूला चीनची ‘बुलेट ट्रेन’ दिसत आहे, ज्यामध्ये केवळ दोन चालक बसलेले आहेत. या व्यंगचित्राच्या माध्यमातून चीनची तांत्रिक प्रगती दाखवण्यात आली आहे, तर भारताच्या ढासळत्या पायाभूत सुविधांचे सादरीकरण करण्यात आले आहे.

याविषयी संताप व्यक्त करतांना केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताची खिल्ली उडवण्याचा ‘डेर स्पीगल’ चा प्रयत्न शहाणपणाचा नाही. काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीपेक्षा पुष्कळ मोठी असेल.’’ केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनीही या व्यंगचित्रावर टीका केली. भारताला अपमानित करून चीनपुढे नमते घेणे, हा या चित्रामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.