शासनाला दिलेल्या अहवालात माकडांचे निर्बिजीकरण करण्याची शिफारस
कोकणात वन्यप्राण्यांमुळे होणार्या हानीवरील उपाययोजना !
रत्नागिरी – कोकणात वन्यप्राण्यांमुळे होणार्या हानीविषयी लोकप्रतिनिधी, कोकण कृषी विद्यापीठ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या नियुक्त केलल्या अभ्यासगटाने शासनाला अहवाल सादर केला आहे. या अहवालात अधिकाधिक हानीभरपाई आणि हानी टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर माकडांचे निर्बिजीकरण करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
राज्यात आंबा, काजू बोंडे,फणस, सुपारी, नारळ आदी फळझाडे, तसेच बांबू आणि फुलझाडे यांचा मोहोर, फुलोरा, पालवी इत्यादीचे वन्यप्राण्यांकडून हानी केली जात आहे. यासंदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात याविषयी सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते.
फळझाडांच्या हानीचे मूल्य निश्चित करण्याकरता कार्यपद्धती ठरवणे आवश्यक असल्याचे सांगत यासाठी समितीची स्थापना करण्यात आली.
वन विभागाचे कोल्हापूर प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक आर्.एस्. रामनुजम यांच्या अध्यक्षतेखाली आमदार शेखर निकम, योगेश कदम, भास्कर जाधव, नितेश राणे, कृषी आयुक्त, कोकण कृषी विद्यापीठ आणि अन्य प्रतिनिधी यांची समिती स्थापन केली आहे. या समितीकडून रत्नागिरी जिल्ह्यातील बांधतिवरे, पालशेत आणि सावर्डे अन् सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वडोस, माणगाव आणि जामसंडे आदी भागांतील बाधित क्षेत्रांतील ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेण्यात आले.
याविषयी मंत्रालयात २४ एप्रिल या दिवशी समितीची बैठकही झाली. या बैठकीत प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह करण्यात येणार्या शिफारशींवर चर्चा करण्यात आली.