महाराष्ट्रासाठी बारसू येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – आम्हाला हा विषय प्रतिष्ठेचा करायचा नाही. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याची आमची सिद्धता आहे. तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथील नियोजित तेलशुद्धीकरण प्रकल्पाला काही स्थानिकांकडून विरोध होत आहे, तसेच राज्यातील विरोधकांनीही या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्याविषयी फडणवीस यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘बारसू गावात सध्या प्रकल्पासाठी बोअर मारले जात आहेत. जागा योग्य असल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीला प्रारंभ होईल. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून यामुळे निसर्गाला कोणताही धोका नाही. या प्रकल्पामुळे प्रत्यक्षपणे १ लाख लोकांना रोजगार मिळेल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना त्यांनीच हा प्रकल्प बारसू येथे उभारण्यासाठी केंद्रशासनाला पत्र पाठवले होते. आता मात्र ते विरोधाची भूमिका घेत आहेत. देशातील सर्वांत मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प गुजरातमधील जामनगर येथे आहे. याचा लाभ गुजरातला झाला आहे. जामनगर तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. आरे येथील कारशेडलाही महाविकास आघाडीकडून विरोध करण्यात आला होता. बारसू येथील प्रकल्पाविषयीही अपप्रचार करण्यात येत आहे.’’