सनातन धर्माला मनुष्यासह प्राणीमात्राचीही चिंता ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या बाजूला वेदाचार्य श्री. आनंद पुरोहित

उज्जैन (मध्यप्रदेश) – जो सर्वांना धारण करतो, तो धर्म ! सनातन धर्म केवळ मनुष्यच नाही, तर प्राणीमात्राचीही चिंता करतो. अशा वेळी भारताला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) बनवून आपला धर्म आणि धर्माचरण यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदूंनी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ‘धर्मसम्राट स्वामी श्री करपात्रीजी महाराज स्मृती समारोह आणि रुद्रचंडी यागा’च्या निमित्त १८ एप्रिल या दिवशी येथील स्वामी शंकराचार्य मठामध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपिठावर जयपूरचे वेदाचार्य श्री. आनंद पुरोहित उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाचे संयोजक इंदूर येथील विश्वनाथ धामचे पं. गोपाल शास्त्री यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा रुद्राक्षाची माळ घालून सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मणपुरी येथील धर्मसंघाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. सप्तर्षि मिश्र यांनी केले.

 

सद्गुरु डॉ. पिंगळे पुढे म्हणाले,

‘‘सनातन हिंदु धर्म एक वटवृक्ष आहे. ज्याचे मूळ वेद आणि धर्मग्रंथ आहेत. सर्व संप्रदाय या वटवृक्षाच्या फांद्या आहेत. ‘आपण आपल्या संप्रदायाचा अहंकार ठेवून आपल्या मुळांनाच विसरून गेलो, तर आपण धर्मापासून तुटलो आहोत’, असे समजा. जर संप्रदायांच्या शिक्षणासमवेत सनातन धर्म आणि शास्त्र यांच्या मूलभूत गोष्टी शिकवण्यात आल्या, तर आपण सनातन धर्माशी जोडलेले राहू. आज कुटुंब, मंदिर, गुरुकुल आणि विश्वविद्यालय यांच्या माध्यमातून हिंदु धर्माचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. पूर्वी औपचारिक किंवा अनौपचारिक वातावरणामध्ये आई-वडील किंवा आजी-आजोबा यांच्याकडून धर्मकथेच्या माध्यमातून नवीन पिढीला धर्मशिक्षण मिळत होते. आज असे धर्मशिक्षण देण्यासमवेतच नवीन पिढीसमोर धर्माचरणाचे कृतीशील आचरणही ठेवणे आवश्यक आहे.’’