श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर सत्ताधारी महाडिक गटाची सत्ता कायम !

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर सत्ताधारी महाडिक गटाची सत्ता कायम

कोल्हापूर – आरोप-प्रत्यारोपांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर सत्ताधारी महाडिक गटाची सत्ता कायम राहिली आहे. या निवडणुकीत माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ आघाडीने सर्वच्या सर्व म्हणजे २१ जागा या सुमारे १ सहस्र २००/३०० च्या मताधिक्याने जिंकत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा पराभव केला. कारखान्यासाठी २३ एप्रिलला मतदान झाले होते, तर २५ एप्रिलला मतमोजणी झाली.

प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक हे संस्था गटातून, तर अमल महाडिक हे ऊस उत्पादक गटातून विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी महाडिक गटातील सर्व उमेदवार हे आघाडीवर होते. विजयानंतर प्रतिक्रिया देतांना आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, ‘‘हा विजय कोल्हापूरच्या सर्वसामान्य सभासदांचा विजय आहे. हा गरीब शेतकर्‍यांचा कारखाना अजून या विजयात आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतलेल्या परीश्रमांचाही सहभाग आहे.’’

या संदर्भात आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘आमचे शक्तीशाली उमेदवार जाणीवपूर्वक बाद करण्यात आले. बाहेरचे काही वाढीव सभासद असल्याने हा पराभव झाला. या निवडणुकीत प्रचाराची पातळी खाली गेली, ती तशी जायला नको होती. यापुढील काळात कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नावर लक्ष केंद्रीत करणार आहे.’’