तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्प अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासाठी लाभदायक ! – युवासेना, दोडामार्ग (सिंधुदुर्ग)
अनावश्यक कामे करून कोट्यवधी रुपये लाटले जात असल्याचा आरोप !
दोडामार्ग – तालुक्यातील तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्प हा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांच्या शासनासाठी पांढरा हत्ती, तर अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासाठी ‘मलिदा’ मिळवून देणारा प्रकल्प आहे. त्यामुळे अनावश्यक कामे करून कोट्यवधी रुपये कमवायचे आणि शासनाचा पर्यायाने जनतेचा पैसा वाया घालवायचा, असे दुष्टचक्र वर्षानुवर्षे चालू आहे. त्यामुळे अशा कामांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) युवासेना तालुका प्रमुख भगवान गवस, उपतालुकाप्रमुख बाबाजी देसाई, मणेरी विभागप्रमुख रामदास मेस्त्री यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.
तिलारी धरणाच्या अनुषंगाने होणार्या कामांविषयी माहिती देतांना गवस, देसाई आणि मेस्त्री यांनी सांगितले की, तिलारी पाटबंधारे प्रकल्पातील सर्व वरिष्ठ अधिकार्यांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाकरता दोडामार्गमध्ये ‘भूमीगत कालवे’ ही नवीन संकल्पना राबवण्यास प्रारंभ केला आहे. प्रत्यक्षात या कामाची काहीही आवश्यकता नाही. नको तिथे अनाठायी निधी खर्ची घालणार्या अधिकार्यांमुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे. आवश्यकता नसलेली कामे आणि ती सुचवणारे अधिकारी यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात येणार आहे.
दोडामार्ग-तिलारी रस्त्यावरील कसई-दोडामार्ग केळीचेटेंब, तसेच खालची घाटवाडी, धनगरवाडी आणि सासोली-भटवाडी या ठिकाणी जलसंपदा विभागाकडून भूमीगत कालवे (बॉक्स वेल) तसेच त्यांच्याशी निगडित अन्य कामे गेल्या काही दिवसांपासून चालू आहेत. मोठमोठी यंत्रसामुग्री, असंख्य कामगार आदींच्या साहाय्याने कोट्यवधी रुपयांची कामे वेगात चालू आहेत. त्या तिन्ही ठिकाणच्या कामांची नेमकी आवश्यकता काय ? अधिकार्यांनी आर्थिक हितासाठी ठेकेदारांना हाताशी धरून ही कामे चालू केली आहेत.