दंगलीनंतर मासाभरात पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे स्थानांतर !
|
छत्रपती संभाजीनगर – ३१ मास छत्रपती संभाजीनगरचा कार्यभार सांभाळल्यानंतर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे स्थानांतर झाले आहे. श्रीरामनवमीच्या आधीच्या रात्री झालेल्या दंगलीनंतर अनुमाने १ मासाने त्यांच्या स्थानांतराचे आदेश निघाले आहेत. त्यांच्या जागी पिंपरी-चिंचवडचे सहपोलीस आयुक्त मनोज लोहिया हे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील, तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम्. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचेही स्थानांतर झाले असून मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) ज्ञानेश्वर चव्हाण हे त्यांच्या जागी रुजू होतील. के.एम्. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचे स्थानांतर विशेष पोलीस महानिरीक्षक आस्थापना, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे झाले आहे.
दंगल, राजकीय आरोप
निखिल गुप्ता यांनी ३१ मासांच्या कारकीर्दीत कोरोना महामारीचा कार्यकाळ हाताळला; मात्र श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा येथे दंगल उसळली. त्यात पोलिसांची १४ वाहने जमावाने जाळली. दगडफेकीत २० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घायाळ झाले होते. अखेरच्या मासात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर थेट हप्तेखोरीचा आरोप केला. एकाच पोलीस ठाण्यात ६० ते ८० लाख रुपयांची हप्ता वसुली केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला होता. नवे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्यासमोर महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका हाताळण्याचे आव्हान आहे.
संपादकीय भूमिकाछत्रपती संभाजीनगर येथील दंगल प्रकरण आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निखिल गुप्ता यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होणे आवश्यक ! केवळ त्यांचे स्थानांतर करणे म्हणजे त्यांनी केलेल्या गुन्ह्यांना एकप्रकारे क्षमाच करणे, असे नव्हे का ? |