महिला कुस्तीपटूंनी केलेले लैंगिक छळाचे आरोप गंभीर ! – सर्वोच्च न्यायालय
|
नवी देहली – येथील जंतरमंतर परिसरात महिला कुस्तीपटूंचे धरणे आंदोलन २५ एप्रिल म्हणजे तिसर्या दिवशीही चालू होते. या प्रकरणी कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. ‘महिला कुस्तीपटूंनी याचिकेत लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या सूत्रांचा विचार करणे आवश्यक आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे. आता या प्रकरणावर २९ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार आहे.
या प्रकरणी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी ‘भारतीय कुस्ती महासंघा’चे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) न नोंदवल्याविषयी देहली पोलिसांना नोटीसही बजावली आहे. (आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कुस्तीपटूंच्या तक्रारीची नोंद न घेणारे पोलीस सामान्य महिलांच्या तक्रारींचे काय करत असतील, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक) तक्रार करणार्या महिला कुस्तीपटूंची नावे उघड होऊ नयेत, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ७ महिला कुस्तीपटूंची नावे न्यायालयीन कागदपत्रांतून काढून टाकण्यास सांगितली आहेत.