आंदोलकांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार : आंदोलक कह्यात !
राजापूरमधील बारसू-सोलगाव येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे प्रकरण
|
रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठीच्या मातीच्या सर्वेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांचा दुसर्या दिवशीही विरोध कायम होता. सर्वेक्षणासाठी येणारे अधिकारी आणि पोलीस यांच्या गाड्यांसमोर आंदोलक महिला आडव्या झोपल्याने प्रश्न निर्माण झाला होता. ‘सर्वेक्षण थांबवले जात नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही’, असा पवित्रा या महिलांनी घेतला. ग्रामस्थांना समजावून सांगूनही त्यांनी न ऐकल्याने पोलिसांनी ग्रामस्थांवर सौम्य लाठीमार करत काही महिला आंदोलकांना कह्यात घेतले.
बारसूमध्ये तणाव, रिफायनरी विरोधक महिलांनी पोलिसांच्या वाहनांचा ताफा अडवला, सौम्य लाठीमार #ratnagirirefinerynewshttps://t.co/w8MyB2bj8C
— Maharashtra Times (@mataonline) April 25, 2023
दुसरीकडे या तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठीच्या मातीच्या सर्वेक्षणाला प्रचंड पोलीस बंदोबस्तात प्रारंभ करण्यात आला. २५ एप्रिल या दिवशी या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या भागात अद्यापही तणावाची परिस्थिती कायम आहे.
मनाई आदेशाचा भंग करू नका ! – पोलीस अधीक्षक
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाऊन मनाई आदेशाचा कुणीही भंग करू नये. या ठिकाणी उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनाही बाजूला करण्यात आले आहे.
(सौजन्य : ABP MAJHA)
काय आहे प्रकरण ?भारत आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार भारतात जगातील सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ‘रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ हे आस्थापन स्थापन करण्यात आले. या आस्थापनात ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’, ‘भारत पेट्रोलियम’ आणि ‘हिंदुस्तान पेट्रोलियम’ यांची भागिदारी आहे. सरकारच्या करारानुसार या प्रकल्पासाठी रत्नागिरीतील समुद्रकिनार्याची निवड करण्यात आली होती. त्यानुसार हा प्रकल्प राजापूरमधील नाणार येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यास स्थानिकांचा प्रचंड विरोध झाला. त्यामुळे वर्ष २०१९ मध्ये नाणार येथील प्रकल्प रहित करण्यात आला. त्यानंतर हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर, नाटे आणि सोलगाव या परिसरात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प बारसू-सोलगाव परिसरातील ३ सहस्र ४०० एकर भूमीवर उभारण्यात येणार आहे. याच प्रकल्पासाठी आता ड्रिलिंग करून मातीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे. |