पाण्याचे ‘स्मार्ट नियोजन कधी ?
उद्योग, व्यवसाय, रोजगार यांसह घरगुती वापरासाठी पाणी हा महत्त्वपूर्ण घटक आहे. मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहरामध्ये ४ किंवा ५ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा नियमित किंवा किमान एक दिवस आड व्हावा, असे सोलापूरवासीयांना वाटत असले, तरी मागील अनेक वर्षांपासून असलेला शहराचा पाणीप्रश्न अद्याप सुटलेला नाही. मागील अनेक मासांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून अनेक भागांत गढूळ, अपुरा, तर काही ठिकाणी अवेळी पाणीपुरवठा होत आहे. जिल्हा परिषदेचे ३०० खोल्यांचे वसतीगृह महापालिकेच्या शेजारीच आहे. तेथे मागील १७ दिवसांपासून पाणी नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्याच्या बादल्या घेऊन जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून दाद मागण्याची वेळ आली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेली, तरी सोलापूरसारख्या मोठ्या शहरात पाण्याची समस्या गंभीर असणे, हे चिंताजनक आहे. पाण्याची समस्या केवळ आता उद्भवली आहे, असे नसून ती मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ असलेल्या सोलापूर शहरात पाणीप्रश्न प्रलंबित असणे, हे प्रशासनाचे अपयश असून पाण्याचे ‘स्मार्ट नियोजन’ होणे आवश्यक आहे.
शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनीचे काम ८ वर्षांत केवळ १७ किलोमीटर अंतर पूर्ण झाले आहे. काही वेळा निधी अभावी, तर काही वेळा राजकीय इच्छाशक्तीअभावी, तर कधी श्रेयवादाच्या भोवऱ्यात हा प्रस्ताव अडकला आहे. मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहराला ४, ५, तर काही ठिकाणी ६ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने सर्वच क्षेत्रांतील विकास खुंटला आहे. काही दिवसांपूर्वी ‘वेक अप सोलापूर फाऊंडेशन’ने शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा करता येऊ शकतो, असा दावा करत आकडेवारीसह आराखडा महापालिका आयुक्तांकडे सादर केला आहे. या आराखड्याचा अभ्यास केल्यास पाणी समस्या सोडवण्यास साहाय्य होईल. सोलापूर येथे १० वर्षांपूर्वी ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने कॉलरा होऊन २१ जणांचा मृत्यू झाला होता. खरेतर त्याच वेळी पाणीपुरवठा करणाऱ्या या पाईपलाईनची दुरुस्ती त्वरित करणे अपेक्षित होते; मात्र अद्याप शहरातील सर्व पाईपलाईन दुरुस्त झालेल्या नाहीत, ही शोकांतिका आहे. यावरून पालिका प्रशासन पाणीप्रश्नाविषयी किती ढिसाळपणा करत आहे, हेच लक्षात येते. असे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर