तीर्थक्षेत्री भ्रमण करून भक्तीचा प्रसार करणारे रामानुजाचार्य !
आज रामानुजाचार्य यांची जयंती आहे. त्या निमित्ताने….
‘वैशाख शुक्ल पंचमी या दिवशी ‘विशिष्टाद्वैत’ या मताचे प्रमुख आचार्य रामानुजाचार्य यांचा जन्म तिरुपती येथे असुरी केशव भट्टर यांच्या घरी झाला. रामानुजांनी कांजीवरम् येथील यादव प्रकाश यांच्याजवळ अध्ययन केले; परंतु पुढे त्यांचे गुरूंशी पटले नाही. प्रथमपासूनच रामानुजाचार्यांचा कल विशिष्टाद्वैताकडे असल्यामुळे त्यांनी अलवारांच्या प्रबंधांचे अध्ययन चालू करून चिंचेच्या झाडाखाली रामाची भक्ती करण्यास आरंभ केला. कावेरी तीरावर यमुनाचार्यांच्या अंत्यविधीचा समारंभ सहस्रो वैष्णव करत असलेले पाहून त्यांना खेद झाला. यमुनाचार्यांची शेवटची इच्छा ‘ब्रह्मसूत्रावर भाष्य करावे’, ही होती. ती पूर्ण करण्याची प्रतिज्ञा रामानुजांनी केली. त्यानंतर त्यांनी कांचीपूर्ण आणि महापूर्ण या २ थोर पुरुषांजवळ अध्ययन केले.
रामानुज मनाने मोठे उदार, श्रद्धावान आणि अतिशय बुद्धीमान होते. स्त्रीने २-३ वेळा मनाविरुद्ध वर्तन केल्यामुळे त्यांनी संन्यास घेतला. त्यांच्याभोवती कुरेश, दशरथी, गोविंदयाति, गोविंदभट्ट, यज्ञमूर्ति इत्यादी शिष्य गोळा झाले. रामानुजांनी त्यांचे तत्त्वज्ञान ‘वेदार्थसंग्रह’ या ग्रंथात सांगितले आहे. ‘उपनिषदांतील तत्त्वज्ञान द्वैतपर आहे’, असे प्रतिपादन करतांना त्यांनी शंकराचार्यांवर टीका केली आहे. वेदांतसूत्रावरील ‘भाष्य’ हा यांचा प्रमुख ग्रंथ ! त्याचप्रमाणे ‘वेदांतसार’, वेदांतदीप’, ‘गीताभाष्य’ वगैरे ग्रंथ रामानुजांनी लिहिलेले आहेत. रामानुजांनी श्रीरंगम्, कुंभकोण, तिरूमंगाई, मलबार, त्रावणकोर, गिरनार, द्वारका, मथुरा, बद्रिनारायण आदी सर्व भरतखंडातील पवित्र क्षेत्री भ्रमण करून त्यांच्या तत्त्वांचा प्रसार केला.
रामानुज श्रेष्ठ प्रकारचे पुरुष होते. सर्व दर्जांच्या आणि जातीच्या लोकांना त्यांनी भक्तीमार्गास लावले. ते कडक; पण प्रेमळ आणि लोकसंग्रहकर्ता होते. त्यांची भक्ती अनुपम होती. रामानुजांचे तत्त्वज्ञान ‘अद्वैतामोदः’ या ग्रंथात म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांनी दिले आहे.’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))